गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा साखर उत्पादन १२ लाख टनांनी घटले
 
वातावरणातील बदल आणि अवकाळी पावसामुळे उसाच्या पिकावर मोठा परिणाम झाला असून त्याचा फटका साखर उत्पादनाला बसल्याने   यंदाच्या हंगामात मार्चअखेर देशातील ३३८ साखर कारखान्यांचा हंगाम   आटोपला आहे. या कालावधीत कारखान्यांनी २९९ लाख टन साखर तयार केली असून अद्याप १९४ साखर कारखाने सुरू आहेत.
गेल्या वर्षीच्या तब्बल १३७ लाख मेट्रिक टन साखरेचे विक्रमी उत्पादन करीत महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान पटकावले होते. त्या वेळी राज्यात १४ लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उसाच्या लागवडीखालील क्षेत्रात झालेली वाढ आणि चांगले पीक यामुळे साखरेच्या उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा होती. राज्यात १३८ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज साखर आयुक्तालय आणि राज्य सरकारने हंगाम सुरू होताना व्यक्त केला होता. २० नोव्हेंबरपासून सुरू झालेला हंगामा येत्या आठवडाभरात संपणार असून आतापर्यंत १०६ सहकारी आणि १०४ खासगी असे १७८ कारखाने बंद झाले आहेत. आता केवळ औरंगाबाद, अहमदनगर आणि पुणे विभागातील आठ ते दहा कारखाने सुरू असून एक लाख ८४ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे . या हंगामात आतापर्यंत एक हजार ५१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून १०४ लाख ८९ हजार मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. म्हणजेच मागील वर्षांच्या तुलनेत यंदा साखरेच्या उत्पादनात ३० ते ३३ लाख मेट्रिक टनाची घट होण्याची शक्यता आहे.
या सगळ्याचे फलस्वरूप देशपातळीवरील हंगामाअखेर होणारे साखर उत्पादन सुमारे ३२५ लाख टन इतके मर्यादित होण्याचा अंदाज आहे. यंदाचे उत्पादन गतवर्षीच्या ३५९.२५ लाख टनांपेक्षा जवळपास ३५ लाख टनांनी कमी राहण्याचा अंदाज आहे.