मुंबई APMC सहसचिव अविनाश देशपांडे यांना निरोप; अधिकारी कर्मचारी भावूक
बाजार समिती टिकवण्यासाठी निवृत्त अधिकाऱ्याचा सहकाऱ्यांना कानमंत्र
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अभ्यासू आणि कर्त्यव्यदक्ष अधिकाऱ्याला भावनिक अंतःकरणाने निरोप देण्यात आला. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अधिकारी व कर्मचारी संघटने तर्फे अध्यक्ष शिवनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कार्यक्रमात त्याच्या आगमनापासून तर त्यांना निरोप देईपर्यंत त्याच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. अविनाश देशपांडे हे अधिकारी आपल्या दिर्घ सेवेतून सेवामुक्त झाले. २९ जून १९९२ रोजी ते बाजार समितीच्या सेवेत रुजू झाले होते. जवळपास ३० वर्ष त्यांनी बाजार समितीच्या   विविध पदांवर काम पाहिले. सध्या पणन आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे ओएसडी म्हणून काम पाहत होते.
तर आपले मनोगत व्यक्त करताना अविनाश देशपांडे यांनी आपल्या कामाचा अनुभव सांगत बाजार समिती टिकवण्यासाठी प्रयत्न करा असा कानमंत्र आपल्या सहकाऱ्यांना दिला. तसेच अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासोबत काम करताना आलेले चांगले-वाईट अनुभव त्यांनी सांगितले. तर त्यांच्या कामामुळे कोणाचे मन दुखावले गेले असल्यास त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली.
ते सेवेत असताना त्यांनी बाजार समितीचे उत्पन्नवाढीसाठी मोठे प्रयत्न केले. तर धान्य मार्केटमध्ये उपसचिव असताना ११० टक्के महसूल जमा केल्याची माहिती धान्य व्यापारी देत आहेत. शिवाय त्यांना बाजार समिती निगडित कायद्याचे ज्ञान असल्याने अनेक प्रश्न मार्गी लावून अडचणीतून मार्ग काढण्याचे काम देशपांडे करत होते. तर बाजार समितीचा सखोल अभ्यास असलेला अधिकारी म्हणून त्यांची आजही ओळख आहे. तर त्यांना निरोप देताना अनेक अधिकारी आणि कर्मचारी भावनिक होऊन त्यांच्या हाताखाली अनेक गोष्टी शिकायला मिळाल्याचे मत व्यक्त केले. परंतू त्यांच्याकडून देशपांडे यांच्या   सारखे बाजार समिती टिकवण्याचा प्रयत्न झाला नसल्याचे दिसून येत आहे.
मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासोबत काम करताना त्यांनी आपल्या कामाच्या शैलीने राज्यातील ३०५ बाजार समित्यांवर विशेष छाप सोडली आहे. त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आदर आणि सन्मान करून काम समजावून घेतले. त्यामुळे विविध समस्यांचे निराकरण करणारे अधिकारी म्हणून त्यांचा विशेष प्रभाव आजही बाजार घटकांवर आहे. बाजार समितीमध्ये अनेक अधिकारी घमंडी आणि अहमपणाने आज हि वागत असल्याने त्यांची कमी बाजार घटकांना सुद्धा जाणवत असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. तर या अधिकाऱ्यांमुळे बाजार समितीबाबत नकारात्मक प्रचार होत असल्याचे बोलले जात आहे. तर देशपांडे नकारात्मक गोष्टीतून सकारात्मक मार्ग काढणारे आणि बाजार समिती टिकवण्यासाठी प्रयन्त करणारे अधिकारी होते. मात्र, आता काही अधिकारी संस्था बुडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याच्याही भावना त्यांच्या निरोप समारंभानंतर व्यक्त झाल्या.
या निरोप समारंभ प्रसंगी आमदार शशिकांत शिंदे, सभापती अशोक डक, माजी पणन संचालक सतिश सोनी, अन्न व नागरी पुरवठा संचालक सुधीर तुंगार, प्रभारी सचिव   संदिप देशमुख, संचालक निलेश वीरा, अशोक वाळुंज, विजय भुत्ता, संजय पानसरे, शंकर पिंगळे, ग्रोमा सचिव मयूर सोनी, बाजार समिती   अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.