४ हजार खर्चात घेतले अडीच लाखांचे कांदा उत्पादन
नाशिक जिल्ह्यात कळवण सटाणा, मालेगाव, देवळा अर्थातच कसमादे पट्टा कांदा लागवडीसाठी विशेष ओळखला जातो, कसमादे परिसराला नाशिक जिल्ह्याचे कांद्याचे आगार म्हणून देखील संबोधले जाते. येथील शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण हे कांदा पिकावरच अवलंबून आहे. कांदा उत्पादक शेतकरी उत्पादनवाढीच्या अनुषंगाने कांद्याला महागड्या फवारन्या आणि रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतात. परिणामी जमिनीचे आणि मानवी आरोग्य धोक्यात येत आहे. मात्र, मालेगाव तालुक्यातील वजीर खेडे गावचे सुपुत्र रवींद्र बागले व दिनेश बागले या बंधूंनी जैविक पद्धतीने कांदा लागवड करून दर्जेदार उत्पादन प्राप्त केले आहे. जैविक खतांचा वापर करून उत्पादित केलेला कांदा हा पूर्णतः विषमुक्त असल्याने त्यांच्या कांद्याला तब्बल तीन हजार रुपये क्विंटल विक्रमी बाजार भाव प्राप्त झाला आणि त्यांचा यावेळी सत्कार देखील करण्यात आला. रवींद्र व दिनेश बागले हे दोन्ही शिक्षक आहेत, या दोन्ही शिक्षकांनी रासायनिक खतांचा दुष्परिणाम ओळखून जैविक पद्धतीने शेती करण्याचा निर्धार केला, त्या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्रातील जैविक शेतीचे कट्टर पुरस्कर्ते म्हणून ज्ञात असलेले सुभाष पाळेकर यांचे प्रशिक्षण घेतले व आपल्या 1 एकर शेतजमिनीत कांद्याची लागवड केली.
त्यांनी कांदा उत्पादित करण्यासाठी कुठल्याच प्रकारची कीटकनाशके तणनाशके बुरशीनाशके तसेच रासायनिक खतांचा वापर केला नाही, त्यांनी पूर्णतः जैविक म्हणजेच सेंद्रिय खतांचा वापर केला. जैविक खतांमध्ये त्यांनी चांगल्या प्रतीचे जुने कुजलेले शेणखत, गोमूत्र, ताक, गुळ इत्यादी नैसर्गिक खतांचा वापर केला. गुळ ताक इत्यादी पदार्थांपासून त्यांनी जीवामृत तयार केले व कांदा पिकासाठी या जीवामृताचा वापर केला. त्यांनी फवारणीसाठी तांदळाचे पाणी व आंबट ताक या पदार्थांचा वापर केला.
पूर्णतः जैविक खतांचा वापर केल्याने रवींद्र व दिनेश बागले यांना कांदा उत्पादित करण्यासाठी त्यांना एकरी मात्र चार हजार रुपये खर्च आल्याचे सांगितले जात आहे. एकरी चार हजार रुपये खर्च करून त्यांना ९० क्विंटल कांद्याचे उत्पादन प्राप्त झाले. या दोन्ही बंधूंनी उत्पादित केलेला कांदा पूर्णतः विषमुक्त असल्याबाबत राष्ट्रीय बागवान अनुसंशोधन केंद्र निफाड यांनी एक प्रमाणपत्र देखील दिले आहे. यासाठी अनुसंशोधन केंद्रात जवळपास १७२ प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
बागले बंधूंनी उत्पादित केलेला कांदा उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी नेला असता त्यांना या कांद्यासाठी ३ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी बाजार भाव प्राप्त झाला. त्यामुळे उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीने या दोन्ही बंधूंचा सत्कार देखील केला. या दोन्ही बंधूंनी जैविक पद्धतीने शेती करून कसे दर्जेदार उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते हे दाखवून दिले आहे. जैविक पद्धतीने शेती केल्यास उत्पादन देखील दर्जेदार मिळते शिवाय यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि मानवाचे आरोग्य देखील धोक्यात पडत नाही.