2 रुपयांचा चेक, 15 दिवसांनी वठणार, शेतकऱ्याची क्रूर थट्टा, राजू शेट्टी संतापले, काय घडलं?
2 रुपयांचा चेक, 15 दिवसांनी वठणार, शेतकऱ्याची क्रूर थट्टा, राजू शेट्टी संतापले, काय घडलं?
निर्लज्ज व्यापाऱ्याला दोन रुपयांचा चेक देताना लाज कशी वाटली नाही.
नवी मुंबई: स्वाभिमानी शेतकरी (Farmers) संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी एक धक्कादायक बाब उघडकीस आणली आहे. आसमानी संकट झेलत शेतकऱ्याने मेहनतीने पिकवलेल्या मालाला शेवटच्या क्षणी कवडीमोल भााव मिळाल्यावर त्यानं जगायचं तरी कसं, असा सवाल या प्रकारानंतर शेट्टी यांनी विचारला आहे. असल्या प्रकाराबद्दल राज्यकर्त्यांनी जरा तरी लाज बाळगावी, असं म्हटलं आहे. 10 पोती कांदा म्हणजेच   500किलो कांदा विकून सदर शेतकऱ्याला 512 रुपये मिळणार होते. मात्र अवघे 509   खर्च वजा करून सदर शेतकऱ्याला व्यापाऱ्याने चक्क 2 रुपयांचा चेक दिला. तसंच हा चेकही पुढच्या 15 दिवसानंतर वठणार असे सांगण्यात आले. शेतकऱ्याची ही क्रूर थट्टा सुरु असल्याची संतप्त टीका शेट्टी यांनी केली आहे.
ट्विटरद्वारे संताप व्यक्त
राजू शेट्टी यांनी ट्विटरवरून या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिलंय, राज्यकर्त्यांनो जरा तरी लाज बाळगा. शेतकऱ्यांनी जगायचं कसं हे तुम्हीच सांगा. एका बाजूला थकबाकी पोटी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन धडाधडा तोडता आणि डोळ्यासमोर पीक करपून जाते. राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी सोलापूर बाजार समितीत 10 पोती कांदे विकल्यावर त्याला किती पैसे आले ..ते बघा.. निर्लज्ज व्यापाऱ्याला दोन रुपयांचा चेक देताना लाज कशी वाटली नाही. व्यापारी शेतकऱ्याला सांगतो 15 दिवसाने हा चेक वटेल…
कोणत्या शेतकऱ्यावर ही वेळ?
सोलापूरच्या शेतकऱ्याबाबत हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. राजेंद्र चव्हाण या शेतकऱ्याला हा अनुभव आल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. राजेंद्र चव्हाण यांनी 512 रुपये किलो कांदा व्यापाऱ्याला विकला. 1 रुपया प्रमाणे त्याचे बिल 512   रुपये झाले. त्यातून भाडे, हमाली, तोलाई आदींसाठीचे 509 रुपये कापून घेण्यात आले. त्यातून राहिलेली 2.49 रुपयांची रक्कम देण्यासाठी चव्हाण यांना केवळ 2 रुपयांचा चेक देण्यात आला. हा प्रकार राजू शेट्टी यांना कळताच त्यांनी संतप्त होत सरकारला प्रश्न विचारला आहे.
कांद्याचे दर घसरले
एपीएमसी बाजारपेठत कांद्याचे दर घसरले आहेत. घाऊक बाजारात किलोमागे पाच ते आठ रुपयांची घसरण झाली आहे. कांद्याच्या दरात गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात घसरण सुरूच , त्यामुळे किसान सभेनेही आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बार्शीत आत्मदहनाचा इशारा
मागच्या काही दिवसांपासून कांदा योग्य भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कांदा शेतीतून लागावाडीचा खर्च सुद्धा निघत नाहीये. बार्शीच्या खडकल गावातील बहुतांश शेतकरी हा कांदा उत्पादक आहे. त्यांचे मोठे नुकसान यामुळे होत आहे. याच गावातील शेतकरी अशोक रोंगे यांचे दोन एकर शेतीत कांदा पिकाची लागवड केली. यासाठी त्यांना 82 हजरांचा खर्च आला. मात्र कांद्याचे दर पडल्याने केवळ 38 हजार रुपये इतकेच पैसे त्यांना कांद्याच्या बदल्यात मिळालेत. त्यामुळे उरलेले पैसे द्यायचे कसे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. संपूर्ण गावात कांदयाचे पीक आहे जर कांद्याला योग्य भाव देण्यासंदर्भात निर्णय न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देखील या शेतकऱ्याने दिलाय.