तोतया ईडी अधिकाऱ्यांकडून तीन किलो सोनं आणि 25 लाखांची रोकड लंपास, मुंबई पोलिसांकडून टोळीला अटक..
तोतया ईडी अधिकाऱ्यांकडून तीन किलो सोनं आणि 25 लाखांची रोकड लंपास, मुंबई पोलिसांकडून टोळीला अटक..
नवी मुंबई : ईडीचे अधिकारी आहोत असे सांगून एका व्यापाऱ्याच्या दुकानात घुसून तब्बल 25 लाखांची रोकड आणि तीन किलो सोने घेऊन पसार झालेल्या एका गॅंगला मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे. मुंबईतल्या एलटी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या झवेरी बाजारमधल्या एका बुलीयनच्या दुकानात काल काहीजण अचानकपणे घुसले. आम्ही ईडीचे अधिकारी आहोत आम्हाला दुकानाची झाडाझडती घ्यायची आहे विराट कुठे आहे ?   अशी विचारणा करत त्यांनी दुकानाची छाननी करायला सुरुवात केली. दुकानात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण देखील आरोपींनी केली. छापेमारीच नाटक करून आरोपीने दुकानातून तब्बल तीन किलो सोनं आणि 25 लाखांची रोकड घेऊन पळ काढला. ही छापेमारी करत असताना दुकानातील काही कर्मचाऱ्यांच्या हातात बेड्या टाकून एका दुकानातून दुसऱ्या दुकानात जाण्याचे नाटक सुद्धा या तोतया ईडी अधिकाऱ्यांनी केलं. या प्रकारानंतर मुंबईतल्या एल टी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केलेली होती. सीसीटीव्ही फुटेच्या माध्यमातून काही आरोपींची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी विविध टीम बनवून आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली. ज्यामध्ये डोंगरी मध्ये राहणारा मोहम्मद फजल हा मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाल. एल टी मार्ग पोलिसांनी मोहम्मद फजल आणि त्याचा मित्र समीर उर्फ मोहम्मद रजीक याला देखील मुंबईतून अटक केली. आरोपीसोबत तोतया ईडी अधिकारी बनून या गुन्ह्यात सहभागी झालेल्या एक महिलेलाही पोलिसांनी रत्नागिरी मधून अटक केलेली आहे. समोरच्यांना अधिक खात्री पटावी यासाठी ही महिला आरोपी ईडी अधिकारी बनून छापेमारीसाठी गेली होती. विशाखा मुधोळ असे या महिला आरोपीचे नाव आहे. गुन्हा घडल्यापासून 24 तासाच्या आत या आरोपींना एल टी मार्ग पोलिसांनी अटक केलेली आहे. अटक आरोपींनी चोरी केलेल्या तीन किलो सोनं आणि 25 लाखांच्या रोख रकमेपैकी अडीच किलो सोन आणि 15 लाख रुपये हस्तगत करण्यात आलेत. या गुन्ह्यात एकूण सहा आरोपींचा सहभाग असल्याचं आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणात अधिक तपास केला जातोय..