गाडी भाड्याने देत असाल तर सावधान! नवी मुंबई पोलिसांकडून वाहन चोर जेरबंद
नवी मुंबई पोलिसांकडून मारूती इको कार चोरी करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी अटक ५४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात रबाळे, कोपरखैरणे, खारघर, पनवेल, कामोठे परिसरातून सन २०२१ मध्ये मारूती इको कार चोरीस गेल्या होत्या. तसेच मुंबई आयुक्तालय व ठाणे आयुक्तालय हददीतून देखील मारुती इको कार चोरीस गेल्या होत्या. या प्रकरणी प्रमुख आरोपी अब्दुल सलाम शेख याला मागील महिन्यात अटक करून पोलीस तपास करत होती. त्यातील आणखी तीन आरोपींना नवी मुंबई पोलिसांनी अटक करून तमिळनाडू राज्यातून एकुण ५४ लाख किमंतीच्या ९ मारुती सुझुकी इको कार हस्तगत करून एकूण १२ गुन्हयांची उकल करण्यात पॊलिसांना यश आले आहे.
उस्मान अहमद सय्यद वय ४९ वर्षे रा. आशियाना अपार्टमेंट, कुर्ला वेस्ट, मुंबई, शहानवाज नजीर अहमद शेख, वय ३९ वर्षे रा. उनवाला कम्पाउंड, ब्राम्हणवाडी, कुर्ला वेस्ट, अब्दुल सलाम मेहबूब शेख वय ३५ वर्षे धंदा- बिगारी रा. जरीमरी, कुर्ला वेस्ट, मुंबई या आरोपींनी मारूती इको कार यांचे मूळ आरटीओ क्रमांक, इंजिन नंबर तसेच चेसीस नंबर नष्ट करून कारची मूळ ओळख पटविता येवू नये याकरीता पुरावा नष्ट केल्याचे तसेच बनावट नंबर प्लेटचा वापर केल्याचे निष्पन्न झाल्याने विविध कलमानुसार कारवाई करण्यात आली आहे.
नवी मुंबई गुन्हे शाखा, कक्ष - १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, पोलीस नाईक शशीकांत जगदाळे, निलेश किंद्रे, पोलीस शिपाई आशिष जाधव व विशाल सावरकर या टिमने नमूद गुन्हयाचे घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहण्यास सुरूवात करून गुन्हयातील मारुती इको कार ही रबाळे दिवागाव सर्कल, ऐरोली टोल नाका, पुढे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेने भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, कामराजनगर, सांताकुझ, चेंबूर- जोडरस्ता, कुर्ला, बिकेसी एमटीएनएल अशी गेल्याची उपलब्ध खाजगी व सरकारी साधन सामुग्रीच्या साहायाने निष्पन्न करून, पुढे सदरची चोरीची कार ही पुन्हा वाशी टोल नाका या ठिकाणाहून गेल्याने शिंदे यांनी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांचेकडून मिळालेल्या तांत्रिक माहितीनुसार एका आरोपीचा संपर्क क्रमांक प्राप्त करून त्याचे तांत्रिक विश्लेषण करून, आरोपींनी एकमेकांशी केलेले आर्थिक व्यवहार व सर्व आरोपींचे संपर्क क्रमांक यावरून नमूद गुन्हयात चार आरोपी असल्याचे निष्पन्न करून त्यापैकी एक ओला कॅब चालक असल्याचे निष्पन्न करून मुंबई मेट्रोपॉलीटन परिसरातून १२ मारूती इको कार चोरल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न केले.