Apmc Election: भाजप Vs राष्ट्रवादी काँग्रेस, कर्जत-जामखेड बाजार समिती निवडणुकीचा रणसंग्राम, रोहित पवार विरुद्ध राम शिंदे , कुणाचं पारडं जड?
अहमदनगर : राज्यात सध्या बाजार समितीच्या निवडणुकीची (APMC Election) रणधुमाळी सुरू आहे. अहमदनगरला कर्जत-जामखेड येथे दोन आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलीये. ही निवडणूक आम्ही जिंकणार असा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे वातावरण चांगलं तापू लागलंय. विधानसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच बाजार समितीची निवडणूक होत आहे. त्यामुळे बाजार समिती आपल्या ताब्यात येण्यासाठी आमदार रोहित पवारांसह आमदार राम शिंदे यांनी देखील बैठकांवर भर देत चांगलीच कंबर कसली आहे. तसेच जामखेड येथील राष्ट्रवादीचे भास्करराव मोरे हे आपला स्वतंत्र पॅनल लढवणार असल्याने आमदार रोहित पवारांना मोठे अहवान असणार आहे. तर पहिल्यांदा शेतकरी निवडणूक लढत असल्याने बाजार समिती खेचून आणण्यात कोणाला यश मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस
बाजार समितीच्या निवडणुकीत आमचा पॅनल शंभर टक्के निवडून येईल असा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलाय. कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यांमध्ये ज्या बाजार समिती आहे त्यांना ताकद देण्याची गरज होती, मात्र ती दिली गेली नाही असा टोला आमदार राम शिंदे यांचे नाव न घेता लगावला आहे. तर मोठ्या प्रमाणात उलाढाल होऊ शकते एवढी ताकद या बाजार समितीमध्ये आहे. मात्र जे व्हिजन आणि दूरदृष्टी लागते ते कोणी दिलेलं नाही अस रोहित पवारांनी म्हटलंय. तर आमचा पॅनल शंभर टक्के निवडून येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
इतिहासात पहिल्यांदाच शेकडो अर्ज
बाजार समितीच्या निवडणुकीवरून भाजपचे आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांवर निशाणा साधलाय. रोहित पवार यांच्याकडे कोणीही उमेदवारी मागायला गेला नाही असा टोला राम शिंदे यांनी लगावलाय. सर्वसामान्य शेतकरी या बाजार समितीच्या निवडणुकीत उभा राहिला पाहिजे असा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतल्याचं त्यांनी म्हटलंय. तर कर्जत जामखेडच्या इतिहासात पहिल्यांदाच इतके अर्ज शेतकऱ्यांनी भरल्याचंही राम शिंदे यांनी सांगितलं.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर नगरपंचायतची एकच निवडणूक झाली, मात्र त्या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांचे अर्ज घेऊन आपल्या ड्रॉवरमध्ये ठेवले गेले, असा आरोप राम शिंदे यांनी केला. तर आमचे विरोधी आमदारांकडे कोणीही उमेदवारी मागितली नाही, उमेदवारी मागितली की मिळेल की नाही याचा लोकांना किंचितही विश्वास नव्हता. त्यामुळे शेकडोंनी अर्ज बाजार समितीच्या निवडणुकीत आले आहेत, असा टोला त्यांनी राम शिंदे यांनी लगावलाय.
भास्करराव मोरेंचं आव्हान
जामखेड येथील राष्ट्रवादीचे नेते भास्करराव मोरे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत स्वतंत्र पॅनल करून लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारासमोर मोठा आव्हान असणार आहे. तर आमदार रोहित पवार यांच्यावर त्यांनी नाव न घेता टीका केली आहे.. स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी लढण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलंय. जे शेतकरी केंद्रबिंदू मानायला पाहिजे, त्या शेतकऱ्यांकडे लक्ष न देता संचालकांनी आणि नेतृत्वाने मार्केट कमिटी ताब्यात ठेवण्यासाठी निवडणूक लढत असतील तर ते दुर्दैव असल्याचं त्यांनी म्हटलय. प्रत्येकाला स्वाभिमान असतो.
प्रत्येक कार्यकर्त्याला दुसरी कशाची अपेक्षा नसते. मान सन्मान त्याचा अभिमान जिवंत राहिला पाहिजे, ही भूमिका असते असा टोला मोरे यांनी लगावलाय. अशा कार्यकर्त्यांना मानसन्मान मिळवून देण्याचा काम मला या निवडणुकीत करायचा आहे,त्यामुळेच मी लढण्याचा निर्णय घेतल्याचं मोरे यांनी सांगितलं. एकूणच,   कर्जत जामखेडच्या बाजार समिती निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.