खतांच्या किमती वाढल्याने शेतकरी हवालदिल
अनुदान मिळणाऱ्या खत पुरवठादारांनी खतांच्या किमती वाढल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. त्यामुळे खतांच्या वाढीव किमती कमी करा, अशी मागणी कृषिमंत्री दादा भुसे यांनी पत्र पाठवून केंद्रीय खते व रसायन मंत्री मनसुख मंडाविया यांच्याकडे केली आहे. ‘‘रब्बी हंगामात अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्रात लागवड योग्य क्षेत्र वाढले आहे. परिणामी खतांची मागणी वाढली आहे. मात्र, अनुदानित खत पुरवठादारांनी खतांच्या किमती वाढविल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यामुळे वाढीव दरांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक भार सहन करावा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने पावले उचलून खतांच्या दरांचा ताबडतोब आढावा घ्यावा आणि खतांच्या दरातील वाढ मागे घेण्यासाठी आवश्यक निर्देश द्यावेत.’’ असे भुसे यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
खत उत्पादकांनी राज्यात ०६ डिसेंबर, २०२१ रोजी घोषित केलेल्या दरानुसार खतांची विक्री करावी. सुरळीत पुरवठा राखण्यासाठी आणि खतांच्या संतुलित वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक पावले केंद्र सरकारने उचलावीत आणि रब्बी हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
खतांचे प्रकार आणि दर पुढील प्रमाणे
दर प्रति ५० किलो
१०:२६:२६ -१४४०ते १६६०
१२:३२:१६ -१४५० ते १६४०
१६:२०:०:१३ -११२५ ते १२५०
अमोनिअम सल्फेट १०००
१५:१५:१५:०९ -१३७५ ते १४५०