Budget 2022 : द्राक्ष उत्पादकांना हवी हक्काची बाजारपेठ अन् उत्पादनावरील खर्चावर नियंत्रण, शेतकऱ्यांच्या अपेक्षा होणार का पूर्ण?
नवी मुंबई : द्राक्षांची पंढरी म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख संबंध देशामध्ये आहे. स्थानिक बाजारपेठेबरोबरच येथी द्राक्षांची मोठ्या प्रमाणात निर्यातही होते. शिवाय दर नियंत्रण असल्याने या द्राक्षाची चव सर्वसामान्य नारगिरकांनाही घेता येत आहे. मात्र, हे सर्व होत असताना द्राक्ष उत्पादकांना कराव्या लागणाऱ्या समस्यांचा सामना याचा देखील विचार होणे गरजेचे आहे. कारण गेल्या काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनावरील खर्च वाढत आहे. शिवाय दराबाबत कोणतीही ठोस भूमिका नसल्याने शेतकऱ्यांना व्यापारी ठरवतील त्याच दरात विक्री करावी लागत आहे. त्यामुळे उत्पादनाची जोपासना ते हक्काची बाजारपेठ मिळावी अशी अपेक्षा आता द्राक्ष बागायतदार शेतकरी करीत आहे. उत्पादनात वाढ झाली तर दर नाहीत आणि दर वाढले तर निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन नाही अशी अवस्था द्राक्ष उत्पादकांची झाली आहे. त्यामुळे यंदाच्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनातून द्राक्ष उत्पादकांच्या देखील अपेक्षा वाढलेल्या आहेत. किमान आधारभूत सुविधा देण्याची अपेक्षा शेतकरी आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत.
द्राक्षावरील औषध किंमतीवर हवे नियंत्रण
द्राक्ष बाग लागवडीपासून ते काढणी पर्यंत सर्वात मोठा खर्च हा औषध फवारणीचा आहे. याशिवाय बागांची वाढच होऊ शकत नाही. यातच गेल्या काही वर्षापासून अवकाळी पाऊस, गारपिट, ढगाळ वातावरण यासारखे प्रतिकूल वातावरण होत आहे. त्यामुळे औषध फवारणीचा खर्च हा वाढलेला आहे. औषधांच्या किंमती नियंत्रणात आणल्या तरी द्राक्ष उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष बागा मोठ्या प्रमाणात आहेत. आतापर्यंत यामधून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्येही वाढ झाली आहे. पण काळाच्या ओघात उत्पादनावरील खर्च वाढला असून दराबाबत कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे औषधावरील खर्च जरी नियंत्रणात आला तरी द्राक्ष उत्पादकांना नवसंजीवनी मिळणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशअध्यक्ष संदीप जगताप यांनी सांगितले आहे.
हवी हक्काची बाजारपेठ अन् मार्केटींगसाठी यंत्रणा
देशांतर्गत द्राक्ष विक्रीसाठी तसेच निर्यात होणाऱ्या द्राक्षवर सबसिडी देण्यात यावे, त्याचप्रमाणे कुठलाही फळ किंवा कुठलाही भाजीपाला आपल्याला जगामध्ये पोहोचवायचा असेल तर चांगला मार्केटिंग करावे लागतात, याची जाहिरात करावी लागते. द्राक्षापासून विटामिन्स, प्रोटिन्स मिळतात. हे सर्वसामान्य माणसापर्यंत जगाच्या प्रत्येक कानाकोपर्यात पोहोचवू शकेल आणि त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात द्राक्षची करावी लागणार आहे. त्याच्यासाठी विशेष चांगली भरीव आर्थिक तरतूद करणे या बजेटमध्ये करणे अपेक्षित आहे. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये नाशिकच्या द्राक्षांची चव आणि त्याचे वैशिष्ट्य पोहोचू शकलो तर निश्चितपणे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली आहे.
द्राक्ष दर निश्चितीही महत्वाची
उत्पादनात घट, वातावरणातील बदल आणि वर्षभर होणारा खर्च या तुलनेत अखेर द्राक्षाला दरही मिळत नाही. यंदा यावर तोडगा म्हणून द्राक्ष उत्पादक संघाने उत्पादनावरील खर्चाच्या हिशोबाने दरनिश्चित केले होते. मात्र, यावर सरकारचे नियंत्रण नसल्याने व्यापाऱ्यांनी मनमानी करीत द्राक्ष खरेदी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे दराबाबतही निर्णय होण्याची अपेक्षा द्राक्ष उत्पादक संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी व्यक्त केली आहे.