मुंबई APMC मसाला मार्केट संचालकच्या विकास कामावरील आक्षेपाने बाजार घटक नाराज; रस्त्यातील खड्यांमुळे अनेकांचा जीव धोक्यात
मुंबई APMC मार्केटमधील कामे रखडल्याने बाजार घटक हैराण झाले आहेत. प्रशासकीय काळात कामे न झाल्याने बाजार घटकांनी संचालक निवडून दिल्यावर तरी कामे होतील असा विश्वास व्यक्त केला. मात्र संचालक येऊन दोन वर्ष उलटली तरीसुद्धा अद्याप बाजार घटकांच्या मरणयातना संपत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मसाला मार्केट संचालक विजय भुत्ता यांनी बाजार समिती प्रशासनाकडे कामांची मागणी केली. परंतू या कामांच्या अंदाजपत्रकावर त्यांनीच आक्षेप घेऊन काम ठप्प झाल्याने बाजार घटक संतापले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या ठिकाणी नियमित छोटे-छोटे अपघात घडत असतात. तर सध्या रस्त्याची दुरावस्था पाहता मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मसाला मार्केट मधील रस्ते डांबरीकरण आणि मलनिःसारण वाहिन्यांच्या कामाच्या दुरुस्तीसाठी २३ जून २०२१ रोजी मार्केट संचालक विजय भुत्ता यांनी पत्राद्वारे मागणी केली होती. यावेळी प्रशासनाने नेमणूक केलेले इकोटेक कन्सलटंट प्रा लिमिटेडचे आर्किटेक्चर यांच्याकडून अंदाजपत्रक तयार करून घेतले. त्यांनी रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण यासाठी २ कोटी ७ लाख तर मलनिःसारण (ड्रेनेज लाइन) दुरुस्तीसाठी २ कोटी ५२ लाख असे एकूण ४ करोड ५९ लाख इतके अंदाजपत्रक दिले. यावर २ डिसेंबर २०२१ रोजी असलेल्या बोर्ड मीटिंगमध्ये संचालक विजय भुत्ता यांच्याकडून आक्षेप नोंदवण्यात आला. त्यामुळे हे काम गेली दोन महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे रस्ता आणि मलनिःसारण वाहिन्यांची कामे मार्गी लागणार असल्याने बाजार घटक आनंदी झाले होते. मात्र यावर संचालकांच्या आक्षेपानेच पाणी फिरल्याने बाजार घटक तीव्र नाराज आहेत.
या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी बोर्डाने सचिव संदीप देशमुख, उपसभापती धनंजय वाडकर, संचालक संजय पानसरे, निलेश वीरा आणि प्रवीण देशमुख ५ सदस्यांची समिती निवडली. तसेच त्रयस्थ अभियंता नेमणूक करून याबाबत पुन्हा अंदाजपत्रक काढून अहवाल समितीने सादर करण्याच्या सूचना देण्यात आली होती. मात्र, यात सुद्धा तक्रारदार आपल्या मर्जीतील अभियंता मागणी करत असल्याने कामात अडथळा येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
मसाला मार्केटमध्ये एकूण १२ पाकळ्या आहेत. मार्केटचा एकूण परिसर ८३ हजार ८९६ स्क्युअर मीटर असून १८ हजार १९६ स्क्युअर मीटर काँक्रीटीकरण पूर्ण आहे. १३ हजार ६०० स्क्युअर मीटरचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले आहे. ५२ हजार १०० स्क्युअर मीटर शिल्लक असून त्यातील ७ हजार ७५० स्क्युअर मीटर असणं त्यासाठी २ करोड ७ लाखाचा अंदाज बांधण्यात आला आहे. एकूण मलनिःसारण वाहिनी ४ हजार ८०० रनिंग मीटर आहे. यातील १५६० रनिंग मीटरचे काम पूर्ण झाले आहे. ३३०० रनिंग फिट काम बाकी असून यातील १५४० रनिंग मीटरच्या कामाचे २ कोटी ५२ लाख अंदाजपत्रक काढण्यात आले होते.
प्रशासकीय काळात कितीही तक्रारी केल्या तरी कामे होत नव्हती. दोन वर्ष झाली आम्ही आमचा प्रतिनिधी निवडून दिला तरी सुद्धा पावसाळ्यात पाणी जमा होऊन बाजार घटकांना मोठा त्रास सहन करावा लागला. वर्षाला जवळपास २० करोड रुपये कर देऊन सुद्धा आम्हाला कोणत्या सुविधा मिळत नाहीत. याबाबत संचालकाककडे तक्रार केल्यास ते प्रशासकाकडे बोट दाखवतात तर प्रशासकाकडे गेल्यास ते मार्केट संचालकांकडे जाण्यास सांगतात. त्यामुळे आमची दयनीय अवस्था कोणाला सांगावी असा प्रश्न पडला आहे. तसेच मार्केटमध्ये अनेक दुर्घटना घडत असल्याने सीसीटीव्ही बसवने सुद्धा बाजारात फार महत्वाचे आहे. तर आम्हाला कमीत कमी मूलभूत सुविधा दिल्या जाव्यात अशी मागणी व्यापारी अमरीशलाल बारट यांनी केली आहे.