शिंदे गटातील 17 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, या जिल्ह्यात शिंदे गटाला मोठा धक्का
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात नवीन चेहऱ्याला तालुकाप्रमुख पदी नियुक्ती देणार आहेत. त्यामुळे शिंदे गटातील शिवसेनेत अस्वस्थता आहे. त्यावर आक्षेप घेत शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय अवताडे, खामगाव तालुकाप्रमुख सुरेश वावगे, युवासेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे, शहराध्यक्ष रमेश भट्टड यांच्या सह 17 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे दिले आहेत. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात घाटा खालील भागात शिंदे सेना खिळखिळी झाली आहे. शिवसेनेचे बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख प्रतापराव जाधव यांच्या नावाने हे पत्र लिहण्यात आले आहे.
राजीनामा पत्रात नेमकं काय?
या पत्रात ते लिहितात, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आपण खामगाव तालुका प्रमुखपद बदल करत आहात. या पदावर देण्यात येणार असलेली व्यक्ती त्या पदासाठी लायक नाही. त्यांना ग्रामीण भागातील पदाधिकारी उदा. विभागप्रमुख, उपतालुका प्रमुख, शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, उपशाखाप्रमुख, शिवसैनिक युवासेना, विद्यार्थी सेना पदाधिकारी कोणीही ओळखीचे नाहीत. ग्रामीण भागातील गावांचीसुद्धा माहिती नाही. यापूर्वी त्यांनी कोणत्याही संघटनेत काम केले नाही. शिवसेनेत येऊन इन-मीन दोन महिने झाले. अशा व्यक्तीची नियुक्ती आपण सरळ तालुका प्रमुख पदावर करत आहात. त्यामुळे आमची तीव्र नाराजी आहे. आम्ही त्या व्यक्तीसोबत काम करू शकत नाही. करिता शिवसेना पदाधिकारी आपल्या पदाचे राजीनामे देत आहोत.
पत्रावर सह्या कुणा-कुणाच्या?
उपजिल्हा प्रमुख संजय अवताडे, खामगाव तालुकाप्रमुख सुरेश वावगे, युवासेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे, उपतालुकाप्रमुख गजानन सातव, गजानन हुरसाड, गोपाल भिल, शहर प्रमुख रमेश भट्ट, शैलेंद्र चौव्हाण, करण, पाटेखेडे, गौरव देशमुख, नमन टिकार, विष्णू काळे, नीलेश देवताळू, विक्की सारवान, आत्माराम बगाडे, अक्षय सूर्यवंशी, चेतन गायकवाड यांनी या पत्रावर सह्या केल्या आहेत. त्यामुळे खामगाव तालुक्यात शिवसेना खिळखिळी होणार आहे.