व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच; बाजार समितीचा कारवाईचा निर्णय
कांदा दराच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. सध्या बाजारपेठेत लाल कांद्यासह उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. हे कमी म्हणून की येथील 9 व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. परवाना नसतानाही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा कांदा तर खरेदी केला पण वेळेत मोबदलाही दिला नाही. यामुळे बाजार समितीची बदनामी तर होत आहे. पण शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे पैसे मिळालेले नाहीत. संबंधित व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची बिले अदा केली नसल्याच्या तक्रारी सोलापूर बाजार समिती प्रशासनाकडे दाखल झाल्या होत्या. त्यानुसार बाजार समितीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात असली तरी शेतकऱ्यांना वेळेत पैसे अदा करणे ही व्यापाऱ्यांची जबाबदारी आहे.
नेमका कसा होतो व्यवहार?
सोलापूरातील श्री सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याची विक्रमी आवक होत आहे. शेतकऱ्यांना कांद्याची विक्री होणार की नाही याची धास्ती आहे. मात्र, वजनकाटा झाल्यावर शेतकऱ्यांना लागलीच रोख रक्कम नव्हे तर धनादेश दिला जातो. हाच धनादेश शेतकरी बॅंकामध्ये घेऊल गेल्यावर संबंधित खात्यावर पैसे नसल्याचे समोर आले होते. त्यानुसार सोलापूर कृषी उत्पन्न प्रशासनाकडे तक्रारी दाखल झालेल्या आहेत. प्रशासक मंडळाच्या बैठकीत संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परवाने नूतनीकरण करण्याचे बंधन
कांदा मार्केटमध्ये परवाने रद्द असतानाही काही व्यापारी हे कांदा खरेदी करीत आहेत. त्यामुळे होणाऱ्या फसवणूकीस जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे. परवाने असूनही फसवणूक झाल्यास बाजार समिती प्रशासनाला हस्तक्षेप करता येतो. त्यामुळे बाजार समितीमधील व्यापऱ्यांना मार्च अखेर पर्यंत परवाने नूतनीकरण करुन घ्यावे लागणार आहेत. शिवाय ही प्रक्रीया पूर्ण करणाऱ्या व्यापाऱ्यांकडेच शेतीमालाची विक्री करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
कांद्याचे दर 900 रुपयांवर स्थिर
उन्हाळी हंगामातील कांद्याची बाजारात एंट्री झाल्यापासून कांद्याचे दर हे घसरले आहेत. 3 हजार रुपये क्विंटलवर असलेला कांदा महिन्याभरातच 1 हजारावर येऊन ठेपला आहे. शिवाय कांद्याच्या मागणीतही घट झाल्याने हीच परस्थिती सर्वच बाजार समितीमध्ये पाहवयास मिळत आहे. कांद्याने यंदा दराचा लहरीपणा दाखवला पण हंगामाच्या अंतिम टप्प्यात. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा थेट परिणाम झाला नाही. पण आता उन्हाळी हंगामात अशीच आवक राहीली तर मात्र, दरात घसरण होणार असल्याचे व्यापारी राहुल मुंढे यांनी सांगितले आहे.