सोयापेंडच्या आयातीबाबत केंद्राच्या विचाराने सोयाबीन दरवाढीची शेतकऱ्यांना खात्री
सोयापेंड आयातीची मर्यादा मार्च 2022 पर्यंत झाल्यास सोयाबीनचे दर घसरणार असे चित्र बाजारपेठेत निर्माण झाले होते. पण आता या सर्व चर्चांना खुद्द वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनीच पूर्णविराम दिला आहे. सोयापेंडच्या आयातीबाबत केंद्राचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना हा मोठा दिलासा असून केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत शेतकऱ्यांनी केले आहे. शिवाय याचा परिणाम आता बाजारपेठेवरही पाहवयास मिळेल. सोयापेंडची आयात करु नये या मागणीचे निवेदन शेतकरी नेते पाशा पटेल यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना दिले आहे.
सोयाबीन दराला घेऊन गेल्या 15 दिवसांपासून वेगवेगळ्या अंगाने चर्चा सुरु होती. या सर्व चर्चाना आता पूर्णविराम मिळाला आहे. सोयापेंडच्या आयातीला खा. डॅा. अमोल कोल्हे, शेतकरी नेते पाशा पटेल तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केला होता.
सोयापेंड आयातीच्या मागणीला महाराष्ट्रातील शेतकरी संघटना तसेच राजकीय नेत्यांनीही विरोध केला होता. अखेर शेतकरी नेते पाशा पटेल यांनी तर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन सोयापेंड आयात केली तर शेतकऱ्यांचे कसे नुकसान होणार आहे हे पटवून दिले होते. त्याच दरम्यान, पियुष गोयल यांनी सोयापेंड आयातसंदर्भात कोणताही विचार नसल्याचे सांगितले. एवढेच नाही तर त्यांनी यासंदर्भात ट्विटही केले आहे. त्यामुळे आता सोयापेंडची आयात होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. सोयाबीन सत्तरी पार होणार असा अंदाज या पूर्वी व्यापाऱ्यांकडून देण्यात आला होता. तर सोयपेंड आयातीच्या निर्णयानंतर दरवाढ निश्चित होईल असा दिलासा शेतकऱ्यांना मिळाला आहे.