तब्बल दोन दशकांनंतर पुणे APMCच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
तब्बल दोन दशकांनंतर पुणे APMCच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
- राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने पुणे APMC ची निवडणूक घेण्याचा दिला आदेश
- २००३ मध्ये आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहारामुळे संचालक मंडळ बरखास्त
- जानेवारी ते मार्च पर्यंत टप्प्याटप्याने मतदार याद्यांची कामे केली जाणार 
 
नवी मुंबई : तब्बल दोन दशकांनंतर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होणार आहे. राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने बाजार समितीची निवडणूक घेण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार १६ जानेवारीपासून मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू झाले आहे . आणि २९ एप्रिलला मतदान घेण्यात येईल ..   त्यामुळे बाजार समितीवर लोकनियुक्त प्रशासकीय मंडळ येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहारामुळे पुणे (हवेली) कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन संचालक मंडळ जिल्हा उपनिबंधकांनी सन २००३ मध्ये बरखास्त केले होते. त्यानंतर राज्यात लोकनियुक्त संचालक मंडळ अस्तित्वात आणण्याऐवजी प्रशासक, प्रशासकीय मंडळ, पुन्हा प्रशासक आणून निवडणुका लांबविण्यात आल्या.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील निवडणुकीस पात्र २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे. त्यात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश नाही. सन २००३ पासून पुणे बाजार समितीवर लोकनियुक्त संचालक मंडळ नाही. त्यामुळे प्रशासकीय मंडळासाठी निवडणूक घेण्याच्या मागणीबाबत दाखल याचिका उच्च न्यायालयात सुरू होती. या सुनावणीदरम्यान पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घेण्यात येईल, असे राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने अधोरेखित केले होते. त्याअनुषंगाने आता प्राधिकरणाने निवडणुकीची घोषणा केली आहे. जानेवारी अखेरपासून १५ मार्चपर्यंत टप्प्याटप्याने मतदार याद्यांची कामे केली जणार आहेत.
बाजार समिती निवडणूक कार्यक्रम
निवडणूक कार्यक्रम जाहीर : २७ मार्च, उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत २७ मार्च ते ३ एप्रिल, उमेदवारी अर्जांची छाननी ५ एप्रिल, वैध उमेदवारी अर्जांची यादी ६ एप्रिल, अर्ज माघारीची मुदत ६ ते २० एप्रिल, अंतिम यादी आणि चिन्हवाटप २१ एप्रिल, मतदान २९ एप्रिलम आणि मतमोजणी व निकाल ३० एप्रिल.