शेतकरी आत्महत्यांमध्ये देशात महाराष्ट्राचा पहिला नंबर; विविध घटक जबाबदार, वाचा सविस्तर रिपोर्ट
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी मागील वर्षी देशात झालेल्या आत्महत्यांचा आकडा जाहीर केला. त्यात सर्वाधिक शेतकरी म्हणजे ५० टक्के शेतकरी महाराष्ट्रातले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी चिंताजनक आणि धक्कादायकबाब बोलली जात आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा हा विभाग शेतकऱ्यांसाठी 'सुसाईड झोन' म्हणूनच ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षात या भागातील अनेक शेतकरी कुटुंबीयांची संसार उद्धवस्त झाले आहेत. गेल्या तीन चार वर्षांपासून मराठवाड्यात दुष्काळ आणि ओला दुष्काळाचा जबरदस्त फटका शेतकऱ्यांना बसला असून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.
राज्यात पणन विभागासह ३०५ बाजार समित्या कार्यरत आहेत. प्रशासनातून पणन संचालकांसह बाजार समिती सचिव काम पाहतात. तर प्रत्येक बाजार समितीला सभापती, उपसभापतींसह संचालक नेमण्यात येतात. राज्यातील विविध भागातून शेतकरी प्रतिनिधी मुंबई बाजार समितीला निवडून येतात. राज्यातून निवडून आलेले आमदार शेतकऱ्यांसाठी कृषी कायदे बनवतात. अशी मोठ्या प्रमाणात यंत्रणा शेतकऱ्यांसाठी काम करत असताना राज्यात शेतकरी सर्वात जास्त आत्महत्या कसे करतात. असा सवाल निर्माण होत आहे. शिवाय आत्महत्या रोखण्यासाठी महावितरण, कृषी विभाग, सहकार क्षेत्र, बाजार समित्या, पाणी पुरवठा विभाग, शेतमाल जाहिरात विभाग, बाजार समिती व्यापारी आणि कर्ज देणारी बँक या सर्वांचे योग्य सहकार्य मोलाचे ठरू शकते.
2020 मध्ये देशात एकूण 5579 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी संसदेत दिली. म्हणजेच गेल्यावर्षी देशात दरदिवशी 15 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. दुष्काळ, ओला दुष्काळ, अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा, रोजगार, कुटुंबातील सदस्यांचं आजारपण, मुलीचं लग्न अशा विविध कारणातून देशात दरवर्षी हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. प्रशासनाचा नाकर्तेपणा हा शेतकऱ्याच्या आत्महत्येमागील सर्वात मोठं कारण आहे. 2020 मध्ये देशात एकूण 5579 शेतकऱ्यांनी विविध कारणातून मृत्यूला कवटाळलं आहे, अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी मंगळवारी संसदेत दिली. 2019 च्या तुलनेत शेतकऱ्यांच्या आत्महत्येत घट झाली असली तरी हा आकडा लहान नाही.
मुंबई एपीएमसी बाजार समितीमध्ये आजही अनेक शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. व्यापाऱ्यांनी शेतमालाचे पैसे न दिल्याने काही शेतकऱ्यांना जमीन विकाव्या लागल्या आहेत. काही जण आत्महत्या करण्याच्या भावना व्यक्त करतात. त्यामुळे व्यापाऱ्यांचा प्रामाणिकपणा शेतकऱ्याला जीवनदान देऊ शकतो. शेतकऱ्यांच्या जीवावर चालणाऱ्या बाजार समितीमध्ये आज हि अनेक शेतकरी पैशासाठी येतात. तर त्यांना चेक देऊन सुद्धा त्यांची फसवणूक होत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी प्रतिनिधी म्हणून मुंबई बाजार समित्यांवर निवडून आलेल्या संचालकांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी भावना व्यक्त केली जात आहे. तरच राज्यातील आत्महत्या थांबतील अशी भावना शेती अभ्यासक व्यक्त करत आहेत.