कृषीमंत्री सत्तारांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांविषयी बेजबाबदार वक्तव्य !
1. सिल्लोड तालुक्यातील आणखी एका तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
2. शेतकरी आत्महत्या हा आजचा विषय नाही, तो अनेक वर्षापासूनचा विषय..
3. या विधानामुळे सत्तार पुन्हा चर्चेत आले असून शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त
शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्येवर सत्तारांची जीभ कशी घसरली ?
मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना चिंतेचा विषय बनला आहे. धक्कादायक म्हणजे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जिल्ह्यात आणि मतदारसंघात आठवड्याभरात तब्बल सहा शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. असे असताना सत्तार यांच्या सिल्लोड तालुक्यातील आणखी एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. बोदवड येथील तरुण शेतकऱ्याने विषारी औषध सेवन करुन आपली जीवनयात्रा संपवली असून घाटी रुग्णालयात उपचारा दरम्यान रविवारी 12 मार्च रोजी त्याची प्राण ज्योत मालवली. या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आला आहे. नंदू भिमराव लाठे वय वर्ष 28 रा.बोदवड ता.सिल्लोड असे या शेतकऱ्याचं नाव आहे.
कृषीमंत्री सत्तार यांचं बेजबाबदार वक्तव्य !
एकीकडे कृषीमंत्री यांच्या जिल्ह्यात आणि मतदारसंघात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. मात्र असे असताना यावर प्रतिक्रिया देताना सत्तार यांनी बेजबाबदार वक्तव्य केलं आहे. शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात, असे वक्तव्य सत्तार यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावरुन सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.