मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये पॅसेज आणि गाडी धक्क्यावर व्यापार करण्यावरून व्यापारी आणि संचालकांमध्ये राडा
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये आज वाटाणा, कोबी व्यापारी आणि मार्केट संचालकांमध्ये खडाजंगी झाल्याचे सांगण्यात येत आहे. वाटाणा व्यापाऱ्यांना गाडी धक्क्यावर माल विकण्यास मनाई करण्यात आल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. गेली अनेक वर्षांपासून ए, सी आणि डि पाकळीमध्ये सर्रास गाडी धक्क्यावर शेतमाल विक्री होते. शिवाय या पाकळ्यांमधून सेस देखील मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मग वाटाणा व्यापाऱ्यांना हा नियम का? असा सवाल केला जात आहे. या प्रकरणी भाजीपाला मार्केट सहायक सचिव यांनी वाद मिटवण्यासाठी नियम सगळ्यांना लागू करा असे सांगताच  संचालकांनी सचिवाला "तुम्ही जास्त शहाणपणा करू नका" असे उद्धट  वक्तव्य  केल्याचे सांगण्यात येत आहे.
वर्षभर संपूर्ण बाजारात पॅसेजमध्ये व्यवसाय केले जातात मात्र, वाटाणा व्यापार सुरु झाल्यावरच संचालक हा फतवा काढत असल्याची माहिती वाटाणा व्यापारी गुप्ता यांनी दिली. शिवाय बाजारात सर्वच पॅसेजमध्ये अवैध खाद्यपदार्थ विक्री होते यांच्यावर का कारवाई होत नाही असा सवाल  निर्माण होत आहे.
वाटाणा हा तरकारीचा राजा आहे, त्यामुळे वाटण्यासह या हंगामात येणार भाजीपाला जर पॅसेजमध्ये विकला गेला तर इतर भाजीपाला विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शिवाय विविध भाजीपाला विक्रीची वेगवेगळी पद्धत असल्याने सर्वांना समान नियम लावता येणार नाही. त्यामुळे या व्यापाऱ्यांनी सुद्धा गाळ्यावर व्यापार करणे अपेक्षित  असल्याची  भावना घाऊक भाजीपाला महासंघाचे अध्यक्ष कैलास ताजने यांनी व्यक्त केली.
कोरोना काळात गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी भाजीपाला बाजारात नियम करून टोकन पद्धती लावण्यात आली होती. त्यावेळी प्रतिदिन जवळपास ३०० ते ३५० गाडी माल आवक बाजारात येत होती. शिवाय बाजार आवारात गाड्या सोडण्याची जबाबदारी मार्केट संचालकांनी घेतली होती. अशावेळी बाजार समितीला कोरोना काळात फारच जुजबी सेस भरण्यात आल्याची माहिती बाहेर आली आहे. त्यामुळे मार्केट संचालक नक्की कोणाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करत आहेत असा सवाल बाजार घटक करत आहेत. बाजार समिती उत्पन्न वाढीच्या बैठकांमध्ये भाजीपाला मार्केट संचालक नियमित सहभाग घेतात मग तो काय फक्त दिखावा आहे का? असा देखील सवाल निर्माण होत आहे.