डॉ. बाबासाहेब आंबेडर स्मारकाचा दोनदा लोकार्पण सोहळा; तिसऱ्यांदा होण्याची शक्यता?
नवी मुंबई ऐरोली सेक्टर १५ मध्ये बांधण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे उदघाटन ५ डिसेंबर रोजी पार पडले. २०१७ मध्ये पहिल्या टप्प्याचे उदघाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. तर आता दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. तर संपूर्ण काम पार पडल्यावर तिसऱ्यांदा भव्यदिव्य उदघाटन सोहळा पार पडणार असल्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात   आहे.
येत्या काही दिवसात नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक जाहीर होणार आहे. त्यावेळी सत्तेत येणाऱ्यांना देखील  स्मारकाचे  काम पूर्ण झाल्यावर अंतिम लोकार्पण करण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. त्यामुळे महापालिका निवडणुकीनंतर सत्येत येणाऱ्यांकडून तिसरा लोकार्पण सोहळा केला जाणार अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.
नवी मुंबईमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक असावे यासाठी लोकप्रतिनिधी व नागरिकांनी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू केला होता. या मागणीची दखल घेऊन महानगरपालिकेने स्मारकाचा ठराव तयार केला. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण १ नोव्हेंबर २०१७ मध्ये करण्यात आले परंतु यानंतरही अंतर्गत सजावटीची कामे अपूर्ण असल्यामुळे नागरिकांना पूर्ण स्मारक पाहता येत नव्हते. स्मारकाचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागला. काम पूर्ण होत आले असून  त्याआधीच लोकार्पण करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्तेच्या बाबतीत फार मोठी उंची होती. त्यांचे नवी मुंबईतील ऐरोलीत कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेले भव्य स्मारक प्रशंसनीय आहे. त्यामुळे हे स्मारक पाहण्यासाठी किंवा त्याचा अभ्यास करण्याच्या हेतूने देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांना - मार्गदर्शक म्हणून ठरेल, असे प्रतिपादन च राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ  शिंदे यांनी रविवारी ऐरोलीत केले.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. त्याप्रसंगी शिंदे बोलत होते. शिंदे पुढे म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांनी जी पुस्तके लिहिली आहेत, तसेच त्यांची दुर्मीळ पत्रे या ठिकाणी पाहण्यासाठी मिळतात, संगणकीय लायब्ररी, याच बरोबरच बाबासाहेबांचा संपूर्ण बालपणापासूनचा जीवन प्रवास यात आहे. त्यांचे दुर्मीळ क्षणसुद्धा पाहायला मिळते, त्यामुळे त्यांचा जीवनपट जवळून पाहता येईल, हे स्मारक सर्वांना प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारे आहे. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी गावठाणाबाहेर बांधलेल्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे याचा फायदा भूमिपुत्रांना होणार आहे, त्यासंदर्भात राज्य शासन स्तरावर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जुन्या धोकादायक इमारतींची पुनर्बांधणीचा प्रश्न निकाली लावण्याचे आश्वासन दिले. आला.
यावेळी खासदार राजन विचारे, पालिका आयुक्त अभिजित बांगर, शिवसेना उपनेते विजय नाहटा, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शिवसेना जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, स्मारक समितीचे कार्याध्यक्ष विजय सुरवाडे, सदस्य सिद्राम ओहोळ आदी उपस्थित होते.