उन्हाळी सोयाबीन पेरणीत पुणे विभाग अग्रेसर; तब्बल २ हजार हेक्टरवर पेरणी
कृषी विभागाकडून सोयाबीनच्या बीजोत्पादनाचा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. त्यानुसार पुणे विभागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली आहे. आतापर्यंत दोन हजार २२२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. आगामी काळात मोठ्या प्रमाणात उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन होईल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
गेल्या काही वर्षांपासून पुणे विभागात उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली जात नव्हती. मात्र, चालू वर्षी पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे येत्या खरिपासाठी सोयाबीन बियाण्यांचा मोठा प्रश्न उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभागाने उन्हाळ्यात सोयाबीन बीजोत्पादनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी फेब्रुवारीपासून तयारी सुरू करत उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. तब्बल एक हजार १८९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात ८५६ हेक्टरवर, तर नगर जिल्ह्यात १७७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
नगर जिल्ह्यात नगरमध्ये १२६ हेक्टरवर पेरणी झाली.श्रीगोंदा, संगमनेर या तालुक्यात त्यास अल्प प्रतिसाद दिला. पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक प्रतिसाद दिला. तालुक्यात तब्बल ५५६ हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली. याशिवाय जुन्नरमध्येही २४० हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर खेड, हवेली, मुळशी, भोर, मावळ, आंबेगाव, शिरूर, इंदापूर, दौंड या तालुक्यातही बऱ्यापैकी पेरणी झाली आहे.
सोलापुरात बार्शी, उत्तर पेरणी
सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत ३४७ हेक्टर, उत्तर सोलापूरमध्ये २५० हेक्टरवर उन्हाळी सोयाबीनची पेरणी झाली आहे. तर दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, सांगोला, मंगळवेढा या तालुक्यातही अल्प प्रमाणात पेरणी झाली आहे.