मुंबई APMC च्या उत्पन्न वाढीसाठी सर्व बाजार घटकांची मेहनत आवश्यक: अशोक डक
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती येथील प्रशासकीय इमारतीसमोर ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. बाजार समिती सभापती अशोक डक यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना वर्षभरातील घडामोडींचा उहापोह अशोक डक यांनी केला. कोरोना प्रादुर्भावामुळे निर्बंधांचे पालन करताना काही शेतमाल कमी करावा लागल्याने बाजार समितीचे उत्पन्न घटल्याचे ते म्हणाले. वर्षभरात अनेक शेतकऱ्यांचे शेतमालाचे थकीत पैसे व्यापाऱ्यांचे गाळे विकून शेतकऱ्यांना दिल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. मुंबईसह उपनगरांमध्ये विनापरवाना व्यापार होत आहेत. अशा पद्धतीचा कोल्ड स्टोरेजमध्ये होत असलेला सफरचंदाचा अवैध व्यापारी दक्षता पथकाने धाड टाकून थांबवला. नुकतीच मंत्रालयात आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गृहमंत्री दिलीप वळसेपाटील आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीत झालेल्या निर्णयाने बाजार समितीला नवसंजीवनी मिळण्याची आशा अशोक डक यांनी व्यक्त केली. शिवाय सर्व बाजार घटकांनी उत्पन्न वाढीसाठी मेहनत घेण्याचे आवाहन अशोक डक यांनी यावेळी केले.
या कार्यक्रम प्रसंगी सभापती अशोक डक, सचिव संदीप देशमुख, बाजार सदस्य अशोक वाळुंज, मुख्य सुरक्षा अधिकारी कृष्णा रासकर, बाजार समिती अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.