शेतमालाचे वजन करून जाग्यावर रोख पैसे घ्या; बाजार समितीचा तत्पर कारभार
शेतकऱ्यांना रोख पॆसे मिळू लागल्याने हळद उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात हळद बाजारात घेऊन येत आहेत. हिंगोलीसह औरंगाबाद, यवतमाळ, बुलडाणा, नांदेड या जिल्ह्यातून हळदीची आवक होत आहे. भल्या पहाटेच वाहनांच्या रांगा ह्या बाजार समितीच्या आवारात पाहवयास मिळत आहे. वाढत्या आवकमुळे आता वजनकाटे कमी पडत असल्याने त्याचे नियोजन बाजार समितीला करावे लागत आहे. हळदीचा उपयोग सौंदार्य प्रसाधने तयार करण्यासाठी केला जातो. त्यामुळेच राज्यस्थान, पंजाब, गुजरात या राज्यातून हिंगोलीच्या हळदीला मागणी वाढली आहे. सध्या आवक वाढली असली तरी ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० चा दर शेतकऱ्यांना मिळत आहे. शिवाय आवक कितीही झाली तरी मात्र, शेतकऱ्यांना त्याच दिवशी रक्कम दिली जात असल्याने राज्यभरातून आवक होत आहे. दरातील तेजीमुळे भल्या पहाटेपासूनच वाहनांच्या रांगा बाजार समितीच्या समोर लागलेल्या असतात.
मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यातून हळदीची आवक येथे होते. येथील व्यवहार चोख असल्यामुळे शेतकऱ्यांचा कलही याच बाजारपेठेकडे अधिक आहे. शिवाय येथील हळदीमध्ये कुकुरमीन या घटकाचे प्रमाण अधिक असल्याने सांगली, सातारा या भागातून मोठी मागणी आहे. यामध्ये सौंदर्य प्रसाधने तयार करण्याचे घटक असल्याने कंपन्यामध्ये मोठी मागणी आहे. शिवाय यंदा पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ झाली असल्याने आवकही वाढली आहे.
हळदीसाठी हिंगोली येथील बाजारपेठ एक मुख्य आगार मानले जात आहे. हळदीचा वजनकाटा झाला की, शेतकऱ्यांना रोख पैसे या ठिकाणी मिळू लागल्याने आवक वाढली आहे. इतर बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना केवळ वायदे दिले जातात. विक्रीनंतरही पैशासाठी खेटा माराव्या लागतात. चोख व्यवहारामुळे शेतकऱ्यांचा कल याच बाजार समितीकडे अधिकचा आहे. आता आवक वाढल्याने वजनकाटे देखील कमी पडत असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी वजन काटे वाढवण्याचे नियोजन असल्याचे बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी सांगितले.