मुंबई-गोवा महामार्गाचे प्रथमच आले हवाई फोटो, नितीन गडकरी यांनीच सांगितले कधी होणार काम पूर्ण
मुंबई : केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी प्रथमच गोवा मुंबई द्रुतगती महामार्गाचे विलोभनीय फोटो शेअर केले आहेत. त्यांनी या महामार्गाची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यांबरोबरीने पाहणी केली. त्यानंतर या मार्गाच्या कामाच्या प्रगतीचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. अपूर्ण राहिलेल्या कामांसंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यामुळे या महामार्गाच्या कामास वेग येणार असून लवकरच मुंबईवरुन सुसाट गोव्याला जाता येणार आहे. सध्य्या 586 किमीच्या या मार्गावरुन जाण्यासाठी ११ तासांचा अवधी लागतो.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ची राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी पाहणी केली. भूसंपादन प्रक्रिया, भूसंपादन मोबदला वाटपातील विलंब व वन्य जमिनीच्या मंजुरीस झालेला विलंबामुळे हे काम वेळेत पूर्ण होवू शकले नाही, परंतु सर्व अडचणींवर मात करून हे काम आता प्रगतीपथावर आहे, असे नितीन गडकरी यांनी ट्विट करत म्हटले आहे.
दहा भागांमध्ये केली विभागणी
राष्ट्रीय महामार्ग विभागांतर्गत मुंबई-गोवा महामार्गाची इंदापूर ते झारप या भागांतील १० पॅकेजेसमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या १० पॅकेजेसची एकूण सुधारित किंमत १५ हजार ५६६ कोटी रुपये आहे. ३५६ किमी लांबीच्या महामार्गावरील २५० किमी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असल्याचे गडकरी यांनी सांगितले. उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिल्ली-मुंबई महामार्ग
काही महिन्यांपूर्वी दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचे फोटो नितीन गडकरी यांनी शेअर केले होते. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन तो सुरुही झाला आहे. हा महामार्ग पुर्ण झाल्यावर मुंबई-दिल्ली प्रवास फक्त 12 तासात प्रवास सुसाट होणार आहे.हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांतून महामार्ग जात आहे. दिल्ली- मुंबई ग्रीन एक्स्प्रेस वे 1380 किलोमीटरचा आहे.
दिल्ली-मुंबई महामार्गासाठी १ लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. दिल्ली ते मुंबई हा 1380 कि.मीचा एक्स्प्रेस वे हा देशातील सर्वात लांबीचा एक्स्प्रेस वे असेल. या महामार्गामुळं दिल्ली ते मुंबई अंतर 130 किलोमीटरनं कमी होईल.
तर, नवी दिल्ली ते मुंबई यामार्गात येणाऱ्या शहरांना जोडलं जाईल. दिल्ली, फरिदाबाद, सोहना, जयपूर शहरांना जोडलं जाईल. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे हा एकूण 8 लेन चा असणार आहे.