कांदा दरात कमालीची घसरण; कांदा उत्पादकांचा डोक्याला हात
महिन्याभरात कांद्याच्या दरात असा काय बदल झाला आहे की, कोसळत्या दराबरोबर शेतकऱ्यांच्या स्वप्नांचाही चुराडा झाला आहे. मार्च महिन्याच्या सुरवातील 3 हजार 200 रुपये प्रति क्विंटल असलेला कांदा याच महिन्याच्या अंतिम टप्प्यात 800 रुपयांवर आलेला आहे. त्यामुळे कांदा दराचा लहरीपणा काय असतो याचा प्रत्यय शेतकऱ्यांना येऊ लागला आहे. खरिपातील लाल कांदा आता अंतिम टप्प्यात आहे. असे असतानाच उन्हाळी हंगामातील कांद्याची आवक सुरु झाली आहे. जानेवारी महिन्यापेक्षा सध्या आवक कमी असताना देखील दरात मोठी घट झाली आहे. मागणीच नसल्याचा हा परिणाम असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील खेड बाजार समितीमध्ये जी परस्थिती तीच सोलापूर आणि लासलगाव मार्केटमध्ये आहे. एकंदरीत आता कांदा दराचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा ठरत आहे.
खेड बाजार समितीमध्ये 20 हजार कट्ट्यांची आवक
कांद्याच्या मुख्य बाजारपेठांमध्ये सध्या सर्वसाधारण अशीच कांद्याची आवक सुरु आहे. येथील समितीच्या महात्मा फुले मार्केट मध्ये कांद्याची 20 हजार कट्ट्यांची आवक झाली होती. ही आवक अधिकची नसतानाही कांद्याला केवळ 900 ते 1 हजार 300 असा दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलेली आहे. अजून उन्हाळी कांदा वावरामध्ये आहे पण सध्या सुगीचे दिवस असल्याने काढणी रखडलेली आहे. उद्या आवक वाढली तर कांदा दराचे काय होणार याची धास्ती शेतकऱ्यांना लागली आहे.
खर्च अधिक उत्पन्न कमी
महिन्याभरापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला आहे त्यांना एकरी 2 ते 3 लाखाचे उत्पन्न हे कांद्यामधून झाले आहे. पण आता परस्थिती बदलली आहे. आवक घटूनही कांद्याला मागणीच नाही. त्यामुळे 500 ते 700 रुपयांपासूनच सौद्याला सुरवात होत आहे. हीच अवस्था लासलगाव, सोलापूर मार्केटमध्ये आहे. त्यामुळे कांद्याचे दर केव्हा सुधारणार हाच मोठा प्रश्न आहे. शिवाय ढगाळ वातावरणामुळे कांदा वावरात ठेवणेही धोक्याचेच आहे.
सोलापुरात केवळ 15 क्विंटललाच अधिकचा दर
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दृष्टीने सोलापूर कांदा मार्केट हे महत्वाचे आहे. त्यानुसार गुरुवारी 37 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली मात्र, केवळ 15 क्विंटल कांद्याला 1 हजार 500 चा दर मिळाला तर उर्वरीत कांदा 800 रुपये प्रती क्विंटलने विकावा लागला होता. आता मार्चनंतर दर वाढतील असा अंदाज आहे. पण कांद्याची साठवणूक करायची कुठे हा प्रश्न आहे.