Sugarcane Season : सातारा जिल्ह्यात ऊसतोड मजूर टॅक्टरसह दाखल
सातारा : कर्नाटक राज्यातील अनेक कारखान्यांचा ऊसगाळप (Sugarcane Crushing Season) हंगाम संपल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊस तोड मजूर (Sugarcane Labor) टॅक्टरसह दाखल झाले आहे.
यामुळे जिल्ह्यातील ऊस तुटण्यास वेग आला आल्याने साखर कारखान्यांचे गाळप (Sugarcane Crushing) उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यामुळे गाळप हंगाम लवकर संपण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात गाळप सुरू असलेल्या १४ पैकी १३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेगात सुरू आहे. खंडाळा कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे.
जिल्ह्यात १४ साखर कारखान्यांकडून ८६ लाख ७४ हजार ६०४ टन ऊस गाळपाद्वारे ८७ लाख ९८ हजार ९६० क्विंटल साखर निर्मिती केली आहे.
साखर उताऱ्यात सुधारणा होऊन सरासरी १०.१४ टक्के उतारा मिळत आहे. गाळप हंगामाच्या सुरुवातीस अनेक कारखान्यांची ऊसतोडणी यंत्रणा विस्कळीत झाल्याने अपेक्षित ऊसगाळप झाले नव्हते.
यंत्रणाअभावी उद्दिष्ट पूर्ण होणार का नाही अशी भीती निर्माण झाली होती. तसेच शेतकऱ्यांचा ऊस तुटण्यास विलंब होत होता.
कर्नाटकातील अनेक कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम संपल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर जिल्ह्यात दाखल झाले आहे.
यामुळे ऊस तुटण्यास गती येऊ लागली आहे. मात्र जिल्हा बाहेरील कारखान्याने ऊस तोडण्यास आल्याने जिल्ह्यातील कारखान्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील अनेक कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणात ऊस तोडला जात आहे. जिल्ह्याच्या तुलनेत या कारखान्यांच्या दर जास्त असल्याने शेतकरी ऊस घालत आहे. यामुळे ऊसाचे क्षेत्र कमी होत आहे.
उद्दिष्ट गाठण्यासाठी धडपड
हंगाम सुरू होताना सर्वच कारखान्यांनी गाळपाची उद्दिष्टे ठरवली होती. इतर जिल्ह्यातील कारखान्यांच्या एंट्रीमुळे उसाचे क्षेत्र कमी होऊ लागले आहे.
ऊसतोडीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या कारखान्यांचे आगमन झाल्याने दिलासा मिळाला आहे. नोंद केलेल्या कारखान्यांच्या वाट न पाहता प्रथम येणाऱ्या कारखान्यास ऊस घातला जात आहे.
यामुळे जिल्ह्यातील कारखान्यांना उसाचे क्षेत्र कमी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकूणच कारखान्यांना उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी धडपड करावी लागत आहे. उद्दिष्ट गाठण्यासाठी कर्नाटकातून आलेल्या ऊस टोळ्या दाखल करून ऊस तोडला जात आहे.
हंगाम लवकर संपणार
उसाचे क्षेत्र आणि कारखान्यांची संख्या यामुळे एप्रिल अखेर ऊस गाळप हंगाम चालेल असे दिसत होते. मात्र आता परिस्थिती बदलली असून कारखान्यांची वाढलेली गाळप क्षमता यामुळे कार्यक्षेत्रा बाहेरील ऊस तोडला जात आहे.
तसेच इतर जिल्ह्यांतील कारखान्यांकडून तोडला जात असलेला ऊस यामुळे ऊसाचे क्षेत्र कमी शिल्लक आहे. यामुळे बहुतांशी कारखान्यांचा १५ एप्रिल अखेर हंगाम संपणार असल्याचा असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.