Hapus Mango : मुंबई APMC फळ मार्केटमध्ये देवगड हापूस प्रतिडझन ८०० ते १२०० रुपये
![hapus-mango-devgad-hapus-at-rs-800-to-1200-per-dozen-at-mumbai-apmc-fruit-market](https://apmcnews.com/apps/home/usermedia/formsStorage/39ee101fda553f131eea092adf4f80d8/photos_featured/2023-03-27-11-45-53/04dd97005268fc67dc9bbb4364242834_devgad-alphonso-hapus-mango-500x500.jpg)
मार्च महिना संपत आला तरी देवगड हापूसचे अपेक्षित उत्पादन न आल्यामुळे आंब्याचा दर प्रतिडझन ८०० ते १२०० आहे.
नवी मुंबई :मार्च महिना संपत आला तरी देवगड हापूसचे अपेक्षित उत्पादन (Hapus Production) न आल्यामुळे आंब्याचा दर (Mango Rate) प्रतिडझन १००० ते १२०० स्थिरावला आहे. उत्पादन कमी असल्यामुळे हाच दर पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.राज्यासह देश-परदेशात देवगड हापूसची प्रतीक्षा असते. बदलत्या वातावरणाचा मोठा फटका गेल्या काही वर्षांपासून देवगड हापूस उत्पादनाला बसत आहे.गेल्यावर्षी अवकाळी पाऊस आणि त्यानंतर फळमाशीने ग्रासलेल्या आंबा उत्पादकांना यावर्षी चांगल्या उत्पादनाची अपेक्षा होती. परंतु यावर्षी सुरुवातीपासूनच हापूस हंगामाला ग्रहण लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.पहिल्या टप्प्यात २० टक्के झाडांना मोहोर आला त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३० तर तिसऱ्या टप्प्यात ५० टक्के झाडांना मोहोर आला होता. परंतु पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मोहोर काही अंशी टिकून राहिला.मात्र तिसऱ्या टप्प्यातील मोहोराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ३९ अंश सेल्सिअसपेक्षा वाढलेले तापमान आणि दोन दिवस पडलेले धुके यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले.
सध्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील देवगड हापूसचे उत्पादन सुरू झाले आहे. परंतु हापूसची प्रमुख बाजारपेठ असलेल्या देवगड शहरात मात्र अद्याप अपेक्षित आंबा आलेला नाही.सध्या शहरात प्रतिडझन १००० ते १२०० रुपयांना आंबा विक्री केला जात आहे. याशिवाय आंब्याच्या ग्रेडनुसार लहान आंबा प्रतिडझन ८०० रुपयांनीदेखील विक्री सुरू आहे. चार डझनची पेटी ३००० ते ३५०० रुपयांनी विक्री केली जात आहे.
तिसऱ्या टप्प्यातील आंब्यासमोर प्रश्नचिन्ह
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील आंबा उत्पादन सुरू झाले असले तरी महत्त्वाच्या तिसऱ्या टप्प्यातील आंबा उत्पादनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील मोहोराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.याशिवाय फळगळदेखील मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील उत्पादन घटण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे यावर्षी मे महिन्यात आंबा चाखायला मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे.