राज्यात अवकाळीचे ढग, ताप-खोकक्याचे घरोघरी पेशंट, त्यातच H3N2 विषाणूचं सावट, लक्षणं, उपाय नेमके काय?
नवी मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात (weather change) अचानक बदल झालाय. मराठवाडा (Marathwada)-विदर्भातील काही भागांना तर पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. त्यामुळे घरोघरी सर्दी, खोकला आणि तापेचे रुग्ण आढळून येत आहेत. व्हायरल इन्फेक्शन झालेल्या असंख्य रुग्णांचा खोकला किमान पंधरा दिवस टिकून राहतोय. त्यामुळे हा नवा कोणता विषाणू आलाय का, अशी शंका सामान्यांच्या मनात उपस्थित होत आहे. शहरी भागापासन ग्रामीण भागापर्यंत बहुतांश घरात असे पेशंट आढळत आहेत. याच दरम्यान, देशात H3N2 विषाणूमुळे तब्बल सहा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. देशात या नव्या विषाणूचा धोका लक्षात घेता, आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. कर्नाटक आणि हरियाणात या विषाणूने दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. नीति आयोगाने यावर गांभीर्यानं पावलं उचलली आहेत. याअंतर्गत विविध राज्यांतील रुग्णांच्या स्थितीचा उद्या आढावा घेतला जाणार आहे. हा विषाणू नेमका काय आहे, त्याची लागण होऊ नये म्हणून काय उपाय करावेत, यासंबंधीची ही माहिती-
H3N2 ची लक्षणं काय?
H3N2 विषाणूची लागण झालेल्या रुग्णांना सर्दी, नाक गळणे, ताप, खोकला, छातीत जळजळ, थकवा, घसा खवखवणे, डोकेदुखी, सांधेदुखी आदी लक्षणं आढळतात. कमी प्रतिकार शक्ती असलेल्या व्यक्तींना या विषाणूची बाधा लवकर होऊ शकते. रुग्णाचा ताप दोन ते तीन दिवसात जातो. मात्र खोकला किमान दोन आठवडे राहतो. सुरुवातीला ओला खोकला आणि त्यानंतर कोरडा खोकला येतो. सततच्या खोकल्यामुळे शरीरात जास्त थकवा जाणवतो.
इन्फ्लुएंझाच्या पेशंटमध्ये वाढ
कोरोना महामारीनंतर नागरिकांच्या प्रतिकार शक्तीत वाढ होईल, असे म्हटले जात होते. मात्र कोरोनानंतर इन्फ्लुएंझासारखे आजार कमी होण्याऐवजी वाढत आहेत. व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणावर वाढ होतेय तर श्वासनलिकेचे आजारही वाढत आहेत.
इन्फ्लुएंझा म्हणजे काय?
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, हंगामी इन्फ्लुएंझा व्हायरस चार प्रकारचे असतात. A,B,C,D. यात A आणि B टाइप विषाणूंमुळे वातावरण बदलताच फ्लू होतो. यापैकी A टाइपचे दोन सबटाइप असतात. त्यापैकी एक H3N2 आणि दुसरा H1N1. आयसीएमआरच्या मते, गेल्या काही दिवसांमध्ये H3N2 च्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर लाढ झाली आहे. १५ डिसेंबरनंतर हे प्रमाण लक्षणीय वाढले आहे.
काय उपाय करावेत?
कमी प्रतिकार शक्ती असलेल्या रुग्णांना या विषाणूची बाधा होऊ शकते. त्यामुळे विषाणू संसर्ग टाळण्यासाठी पुढील उपाय करता येतील.
मास्क घालावा. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं.
डोळे आणि नाकाला वारंवार स्पर्श करू नये.
खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाकावर रुमाल झाकावा.
ताप किंवा अंगदुखी असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सार्वजनिक ठिकाणू थुंकू नये.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटिबायोटिक गोळ्या घेऊ नका.