माथाडी कामगारांच्या दोन्ही नेत्यामध्ये मतभेद आहेत काय?, नरेंद्र पाटील यांनी पहिल्यांदाच दिली कबुली; नेमकं काय म्हणाले?
१५ मार्च रोजी विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात माथाडी कामगारांचे धरणे आंदोलन पार पडले. दरम्यान या आंदोलनाबाबत माथाडी कामगारांच्या नेत्यांमध्ये दुफळी पहायला मिळाली. नरेंद्र पाटील यांनी जाहीर केलेल्या धरणे आंदोलनाच्या सभेला शशिकांत शिंदे उपस्थित राहिले नाहीत. यावर १४ मार्च रोजी शशिकांत शिंदे यांनी सभा घेऊन नरेंद्र पाटील बसून चर्चा करत नसल्याचा आरोप केला. यावर प्रतिक्रिया देताना नरेंद्र पाटील म्हणाले ३१ मार्च तिथीनुसार अण्णासाहेबांची पुण्यतिथी पार पडल्यावर सभा लावणार आहे. दोन दिवसांपूर्वी माथाडी कामगारांच्या मुकादमाचा खून झाला. शशिकांत शिंदे विधान परिषदेचे सदस्य असताना हा मुद्दा मांडला गेला नाही.   महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर कामगारांच्या समस्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलिप वळसेपाटील आणि हसन मुश्रीफ यांनी बैठक घेतली. पुन्हा दिलीप वळसेपाटील यांनी आणखी एक बैठक घेतली. या चार बैठका होऊन सुद्धा हातात काही आले नसल्याचे सांगत केवळ माझा पक्ष सत्तेवर आहे, म्हणून आंदोलन करू नका अशी भूमिका चुकीची असल्याचे नरेंद्र पाटील म्हणाले.
मात्र या दोन्ही नेत्याच्या मतभेदांमध्ये सामान्य माथाडी कामगार चिंतेत आहे. तर माथाडी चळवळ मजबूत राहण्यासाठी नेत्यांनी एकत्र यावे अशी भावना माथाडी कामगारांनी व्यक्त केली आहे. संघटनेत राजकारण आल्यास त्यांचा फायदा इतरांना होऊन मुळ माथाडी कामगारांचे नुकसान होईल. त्यामुळे गरीब गरजू माथाडी कामगार संघटना अभेद राहण्यासाठी देवाला साकडे घालत आहेत.
तर कोणत्याही विषयावर मतभेद असेल तर बसून चर्चा करणे अपेक्षित आहे. मात्र एकत्र बसून चर्चाच केली जात नसल्याची खंत आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली. तर यापूर्वीच्या सरकारच्या काळात कामगार कायद्याच्या विरोधातील नोटिफिकेशन तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी मागे घेतले. ते परिपत्रक स्वतः मेळाव्यात विनोद तावडे घेऊन आले आणि त्यांनी ते पत्र हातात दिले. त्यामुळे त्यावेळचे मुख्यमंत्री माथाडींच्या विषयावर गंभीर होते. मग या सरकारला काय झाले. शिवाय आपण ज्या पक्षात आहोत. तो पक्ष सत्तेत असेल तर आपली जबाबदारी असते कि कामगारांना आंदोलन न करता न्याय मिळवून द्यायचा अशी कोपरखळी नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदेंना मारली. तर मी सुद्धा राष्टवादीचा एक काळचा आमदार होतो. त्यावेळी सुद्धा मी मोर्चे काढले होते. माथाडी कामगारांसाठी मी कोणतेही टोकाचे पाऊल उचलू शकतो असेहि ते आपल्या प्रतिक्रित म्हणाले.
संघटनेला जन्म घालणारी मंडळ जर आमची असतील. आणि आमचेच नेते त्यांच्या बरोबर फोटो काढत असतील संगनमताने काम करत असतील तर काय चर्चा करणार त्यामुळे या सगळ्यावर आत्मचिंतन करण्याची गोष्ट आहे. शशिकांत शिंदेनी १४ मार्च रोजी माथाडी भवनमध्ये जे भाषण केले. त्या भाषणाच्या संबंधामध्ये ३१ तारखेला अण्णासाहेबांची तिथी प्रमाणे पुण्यतिथी झाल्यावर आम्ही एक बैठक लावणार आहोत. या बैठकीत माझ्याबद्दल त्यांना किती व्देष
आहे. त्यांनी सांगावा आणि त्यांना जे वाटते नरेंद्र पाटील चर्चा करत नाहीत. तर ते मनातून पहिले नक्की करावे. त्यांचे माथाडी कामगार कंत्राट पद्धतीमध्ये किती हित संबंध आहेत. त्यांनी चांगल्या मानाने काम करावे, संघटन वाढवावे आम्ही त्यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. आम्ही त्यांना नेतेच म्हणतोय पाच वेळा तुम्ही आमदार राहिले आहेत. तुम्ही आमच्या पेक्षा विद्वान माणसे आहेत. तुमच्याकडूनच आम्ही शिकतोय. मला कधी कमी पणा वाटत नाही. कामगारांच्या हितासाठी कोणाचेही नेतृत्व आम्ही स्वीकारण्यास तयार आहोत. प्रामाणिकपणे आम्ही काम करतो कामात स्पर्धा असली पाहिजे. राजकारणात नसावी. हे आमचे तत्व आहे.
सरकारमधील मराठे नेते चळवळीत सहभागी होत नाहीत. माथाडी कामगार चळवळीत सुद्धा वाईट प्रवृत्तीच्या लोकांकडून माथाडी नेत्यांना हाताशी धरून माथाडी कामगारांवर अन्याय केला जात आहे. नवीन संघटना येऊन माथाडी कामगारांची कामे करण्याऐवजी स्वतःची खिशे भरण्याचे काम करतात. कंत्राट पद्धती कशी लागू करायची आणि माथाडी कायद्याच्या नावाखाली खंडणी कशी गोळा करायची हे प्रकार सुरु आहेत. त्यामुळे संघटनांमध्ये मत भिन्नता झाली आहे. हि मत भिन्नता मिटेल असे मला वाटत नाही. माथाडी कामगार चळवळींमध्ये देखील स्पर्धा सुरु आहे. त्यात इतर लोक उतरल्याने आम्हाला काही वाईट वाटण्याचे काम नाही.