अवकाळी पावसाने द्राक्ष शेतकरी उध्वस्त; प्रचंड नुकसानीने चिंताग्रस्त
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या असल्याने फळबागांसह रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांतील अवकाळीने अवकृपा दाखविल्याने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे काही ठिकाणी द्राक्षाचे घड हे कुजत आहेत. वर्षभरापासून जोपासलेल्या द्राक्ष फळबागांचे शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत नुकसान होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसायच अडचणीत आल्याचे पावलोपावली जाणवत आहे. उत्पन्न वाढीसाठी शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत असले तरी निसर्गाची अवकृपेने पदरी निराशाच पडत आहे.
द्राक्षाच्या उत्पादनात होणार घट, पावसाने न भरुन निघणारे नुकसान
अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा द्राक्षबागांना बसलेला आहे. कारण पंढरपूरसह नाशिकमध्ये द्राक्ष काढणीला अवघ्या आठ दिवसांनीच सुरवात होणार होती. मात्र, वातारणातील बदल आणि अवकाळी पाऊस यामुळे आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. तर द्राक्षांवर फळकूज, मणीगळ, डाऊनी व भुरा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आता याचे व्यवस्थापन केले तरी झालेले नुकसान भरुन निघणार नाही. एकरी 50 हजार रुपये खर्ची करुन पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी बागांची जोपासना केली होती. शिवाय अधिकचे उत्पन्न मिळावे म्हणून तालुक्यात द्राक्ष बागाचे क्षेत्र हे वाढत आहे. पण निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.