Mathadi Workers News:महाराष्ट्रात माथाडी आणि सुरक्षा रक्षक कायद्यात मोठे बदल, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, मंत्रिमंडळाची मंजुरी!
नवीन कामगार संहितेच्या अंमलबजावणीची तयारी १९६९ चा माथाडी कायदा आणि १९८१ चा सुरक्षा रक्षक कायदा सुधारणार.
Mathadi Workers News : माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षकासाठी मोठी बातमी समोर येत आहे.
राज्यात नवीन कामगार संहिता लागू करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम १९६९ आणि महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम १९८१ या दोन महत्त्वाच्या कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.या   निर्णयामुळे राज्यातील माथाडी, हमाल आणि सुरक्षा रक्षक कामगारांच्या रोजगार व कल्याणाशी संबंधित कायद्यांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निर्णयाकडे राज्यातील कामगार वर्गाचे लक्ष लागले आहे.
२९ कामगार कायद्यांचे चार संहितांमध्ये एकत्रीकरण
केंद्र सरकारने देशातील विविध २९ कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून चार नवीन कामगार संहिता तयार केल्या आहेत. कामगारांचे हक्क सुरक्षित ठेवण्याबरोबरच उद्योग व्यवसायासाठी सुलभ वातावरण निर्माण करणे, हा या संहितांचा मुख्य उद्देश आहे.
या चार कामगार संहितांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे.
१. वेतन संहिता, २०१९ : किमान वेतन, वेतन देण्याची पद्धत, बोनस आणि समान वेतन यासंबंधी तरतुदी.
२. औद्योगिक संबंध संहिता, २०२० : कामगार संघटना, औद्योगिक वाद, सेवा अटी आणि नियोक्ता-कामगार संबंधांचे नियमन.
३. सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० : भविष्य निर्वाह निधी (PF), कर्मचारी राज्य विमा (ESI), ग्रॅच्युइटी, मातृत्व लाभ आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा समावेश.
४. व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामकाज परिस्थिती संहिता, २०२० : कामाच्या ठिकाणी सुरक्षा, आरोग्य, कामाचे तास आणि कामगारांच्या कल्याणासाठी नियम.
माथाडी आणि सुरक्षा रक्षक कायद्यांचा स्वतंत्र विचार
केंद्र सरकारने तयार केलेल्या चार कामगार संहितांमध्ये महाराष्ट्र विधानमंडळाने संमत केलेल्या माथाडी व हमाल कायदा १९६९ आणि खाजगी सुरक्षा रक्षक कायदा १९८१ यांचा समावेश करण्यात आलेला नाही.
त्यामुळे नवीन कामगार संहितांच्या अनुषंगाने राज्यातील या दोन्ही कायद्यांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतला आहे.
माथाडी कामगारांच्या दृष्टीने निर्णय महत्त्वाचा
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह राज्यातील विविध बाजारपेठांमध्ये माथाडी आणि हमाल कामगारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मालाची चढ-उतार, हाताळणी आणि वाहतुकीशी संबंधित कामांमध्ये या कामगारांचे योगदान मोठे आहे.त्यामुळे १९६९ च्या माथाडी कायद्यात नेमक्या कोणत्या सुधारणा केल्या जाणार, कामगारांचे विद्यमान हक्क आणि कल्याणकारी व्यवस्था कशी कायम ठेवली जाणार, याकडे माथाडी कामगार, व्यापारी आणि बाजार समित्यांचे लक्ष लागले आहे.
आता मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर या सुधारणांचे प्रत्यक्ष स्वरूप काय असेल आणि त्याचा माथाडी कामगारांच्या रोजगार, हक्क व कल्याणकारी योजनांवर काय परिणाम होईल, हे महत्त्वाचे ठरणार आहे.