APMC GR : बाजार समित्यांच्या देखरेख शुल्काचा नवा हिशेब! पणन संचालकांकडे जाणार निधी, सचिव संवर्गाच्या वेतनासाठी PLA खाते मंजूर, शासनाचा मोठा निर्णय!
बाजार शुल्काच्या आर्थिक व्यवस्थेत मोठा बदल पणन संचालकांच्या नावाने स्वतंत्र खाते उघडण्यास मंजुरी
राज्य शासनाऐवजी पणन संचालकांकडे देखरेख शुल्क २५ नोव्हेंबरचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय
राज्य शासनाऐवजी आता पणन संचालकांकडे बाजार शुल्क!
निधीच्या वापरावर प्रश्न पारदर्शकतेची जबाबदारी पणन संचालनालयावर.
Maharashtra APMC : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित महत्त्वाचा निर्णय पणन विभागाने घेतला आहे. बाजार समित्यांकडून शेतीमालाच्या खरेदी व्यवहारांवर आकारण्यात येणारे देखरेख शुल्क यापुढे राज्य शासनाऐवजी थेट पणन संचालकांकडे जमा होणार आहे. यासाठी पणन संचालक, पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या नावाने स्वतंत्र स्वीय प्रपंजी लेखा (PLA/PDA) खाते उघडण्यास शासनाने मान्यता दिली आहे. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी झालेल्या या शासन निर्णयामुळे राज्यातील बाजार समित्यांकडून जमा होणाऱ्या देखरेख शुल्काच्या वापराची आर्थिक व्यवस्था बदलणार आहे.
विशेष म्हणजे, या निधीचा वापर राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या प्रस्तावित सचिव संवर्गातील सचिवांचे वेतन व भत्ते, पणन संचालनालयातील सचिव संवर्ग कक्षातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन आणि प्रशासकीय खर्च भागविण्यासाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा थेट आर्थिक लाभ सचिव संवर्ग आणि पणन संचालनालयाच्या प्रशासकीय यंत्रणेला होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नेमकी सुधारणा काय झाली?
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ च्या कलम ३४-अ मध्ये ३१ डिसेंबर २०२५ रोजीच्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ५२ अन्वये सुधारणा करण्यात आली. यामध्ये कलम ३४-अ मधील ‘राज्य शासनास देण्यात येईल’ या शब्दांऐवजी ‘संचालकास देण्यात येईल’ अशी तरतूद करण्यात आली.
या कायद्यातील बदलानंतर बाजार समित्यांकडून जमा होणारे देखरेख शुल्क पणन संचालकांकडे जमा करण्यासाठी स्वतंत्र खाते उघडण्याचा प्रस्ताव पणन संचालनालयाने शासनाकडे पाठविला होता. अखेर २५ नोव्हेंबर २०२६ रोजी शासनाने त्यास मंजुरी दिली.
या निधीचा फायदा नेमका कोणाला?
शासन निर्णयातील अट क्रमांक दोनमध्ये या निधीच्या वापराचे स्वरूप स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार निधीतून पुढील खर्च भागविला जाणार आहे.
१. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या प्रस्तावित सचिव संवर्गातील सचिवांचे वेतन व भत्ते.
२. पणन संचालनालयातील सचिव संवर्ग कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते.
३. सचिव संवर्गाशी संबंधित प्रशासकीय खर्च.
४. कार्यालय भाडे, अभिलेख कक्ष, जाहिरात, संगणक, स्टेशनरी आणि फर्निचर.
५. वीज, पाणी, दूरध्वनी, वायफाय कनेक्शन आणि इतर अनुषंगिक खर्च.
यावरून हा निधी केवळ बाजार समित्यांच्या सचिवांच्या वेतनापुरता मर्यादित नसून पणन संचालनालयाच्या सचिव संवर्ग कक्षाचा प्रशासकीय खर्च भागविण्यासाठीही वापरला जाणार आहे.
बाजार समित्यांवर आर्थिक जबाबदारी कायम
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून त्यांच्या बाजारातील किंवा बाजार क्षेत्रातील नियमनातील शेतीमालाच्या खरेदी किमतीवर दर शंभर रुपयांमागे आकारण्यात येणारे देखरेख शुल्क पणन संचालकांच्या नावाने उघडण्यात येणाऱ्या खात्यात जमा करावे लागणार आहे.
म्हणजेच बाजार समित्यांकडून शुल्क जमा करण्याची व्यवस्था कायम असली, तरी त्या शुल्काचा जमा होणारा निधी आता राज्य शासनाऐवजी पणन संचालकांच्या खात्यात जाणार आहे.
व्यापारी आणि शेतकऱ्यांना थेट फायदा काय?
या निर्णयातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या निधीतून बाजार समित्यांमधील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शेतकऱ्यांसाठी सुविधा किंवा बाजारपेठेचा विकास यासाठी थेट तरतूद करण्यात आली आहे का? शासन निर्णयातील निधी वापराच्या अटींमध्ये अशा कामांचा स्पष्ट उल्लेख नाही.
त्यामुळे या निर्णयाचा थेट फायदा व्यापारी किंवा शेतकऱ्यांना होणार असल्याचे या शासन निर्णयावरून सांगता येत नाही. निधीचा मुख्य उद्देश सचिव संवर्गाचे वेतन, भत्ते आणि त्यासंबंधित प्रशासकीय खर्च भागविणे हा आहे.
दुसरीकडे, सक्षम सचिव संवर्ग आणि प्रशासकीय यंत्रणा निर्माण झाल्यास बाजार समित्यांचे कामकाज अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे. मात्र त्याचा प्रत्यक्ष फायदा बाजार घटकांना कितपत मिळतो, हे अंमलबजावणीवर अवलंबून राहणार आहे.
आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण कोणाचे?
शासनाने या खात्यासाठी काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. खात्यात वेळोवेळी आर्थिक व्यवहार होणे आवश्यक असून ते खाते निष्क्रिय राहणार नाही, याची जबाबदारी पणन संचालनालयावर टाकण्यात आली आहे.
या खात्यातील व्यवहारांचे ताळमेळ आणि परीक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारीही पणन संचालनालयाची राहणार आहे. तसेच महालेखापालांची मान्यता घेणे आवश्यक करण्यात आले आहे. वित्त विभागाच्या ५ सप्टेंबर २०२३ च्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, PLA खाते एका वर्षापेक्षा अधिक काळ निष्क्रिय राहिल्यामुळे बंद झाल्यास त्यातील जमा रक्कम शासनाच्या लेखाशीर्ष ००७५ मध्ये जमा करावी लागणार आहे.
पारदर्शकतेचा खरा कस अंमलबजावणीत!
एका बाजूला सचिव संवर्गासाठी स्वतंत्र आर्थिक व्यवस्था निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, तर दुसऱ्या बाजूला बाजार समित्यांकडून जमा होणाऱ्या निधीचा विनियोग, खर्चाचे विवरण आणि त्यातून मिळणारा प्रत्यक्ष लाभ यावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्यातील बाजार समित्यांकडून जमा होणाऱ्या या निधीची एकूण वार्षिक रक्कम किती असेल, प्रत्येक बाजार समितीचा त्यातील वाटा किती असेल, सचिव संवर्गाच्या वेतनावर किती खर्च होईल आणि प्रशासकीय खर्च किती असेल, याची माहिती सार्वजनिक होणे आवश्यक आहे.
बाजार समित्यांच्या व्यवहारांतून जमा होणाऱ्या शुल्कातून आता सचिव संवर्ग आणि पणन संचालनालयाचा खर्च भागणार आहे. मात्र, या व्यवस्थेतून बाजार समित्यांचा कारभार सुधारतो का, व्यापारी-शेतकऱ्यांना सुविधा मिळतात का आणि निधीचा विनियोग पारदर्शक राहतो का, हेच या निर्णयाच्या यशाचे खरे मापदंड ठरणार आहेत.
या GR मधील महत्त्वाचे मुद्दे – पत्रकारितेच्या दृष्टीन
मुद्दा काय बदलले?
-कायदेशीर बदल कलम ३४-अ मध्ये सुधारणा
-आधीची व्यवस्था देखरेख शुल्क राज्य शासनास देण्याची तरतूद
-नवीन व्यवस्था देखरेख शुल्क पणन संचालकांकडे
-खाते PLA/PDA खाते
-प्रमुख लाभार्थी प्रस्तावित सचिव संवर्ग व पणन संचालनालय
-निधीचा वापर वेतन, भत्ते व प्रशासकीय खर्च
-जबाबदारी पणन संचालनालय
देखरेख ताळमेळ, परीक्षण आणि महालेखापालांची मान्यत