Maize Farmers Update: मक्याची विक्रमी आवक, अचलपूर बाजार समिती फुलली!
एकाच दिवसात ६० हजार कट्ट्यांची आवक हंगामातील एकूण आवक ५ लाख १५ हजारांवर
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क : मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांच्या मक्याने अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC )गजबजली आहे. यंदा मक्याच्या आवकेने विक्रमी टप्पा गाठला असून आतापर्यंत तब्बल ५ लाख १५ हजार कट्टे मका बाजार समितीत दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी एकाच दिवसात तब्बल ६० हजार कट्ट्यांची आवक नोंदविण्यात आली. त्यामुळे बाजार समितीचे आवार मक्याच्या कट्ट्यांनी भरून गेले असून ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरगाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मेळघाटातील धारणी, चिखलदरा तसेच लगतच्या परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी अचलपूर बाजार समिती हे मक्याच्या विक्रीचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. शेतमालाची विक्री केल्यानंतर रोजच्या रोज परतावा मिळत असल्याने शेतकरी या बाजारपेठेला पसंती देत आहेत. त्यामुळे हंगामात येथे मक्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.
यापूर्वी अचलपूर बाजार समितीत ४ लाख ६६ हजार कट्टे मक्याची आवक नोंदविण्यात आली होती. मात्र, गुरुवारी एकाच दिवसात ६० हजार कट्टे दाखल झाल्याने एकूण आवक ५ लाख १५ हजार कट्ट्यांवर पोहोचली. सध्या मक्याला प्रतिक्विंटल २ हजार ७०० ते ३ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
सोमवार आणि गुरुवार या दोन दिवशी व्यापाऱ्यांची संख्या अधिक असल्याने मक्याची आवक वाढते. या दिवशी ५० ते ६० हजार कट्ट्यांची आवक होते, तर इतर दिवशी सरासरी ३० हजार कट्टे मका बाजारात दाखल होतो. मोठ्या आवकेमुळे शेतकरी, व्यापारी आणि हमालांची बाजार आवारात दिवसभर वर्दळ असते.
सोयाबीन, गहू, तूर आणि हरभऱ्याचीही आवक
मक्यासोबतच इतर शेतमालाचे व्यवहारही बाजार समितीत सुरू आहेत. आतापर्यंत सोयाबीनचे ३१ हजार ९६० कट्टे, गव्हाचे ११ हजार ६७१ कट्टे, तुरीची ९ हजार २६० पोती, तर हरभऱ्याची १ हजार ४०० पोती आवक झाली आहे.
शेतकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था
मोठ्या संख्येने शेतकरी शेतमाल विक्रीसाठी येत असल्याने बाजार समिती प्रशासनाने त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. तसेच शेतमालाचे अचूक वजनमाप होऊन विक्रीनंतर वेळेत पैसे मिळावेत, यासाठीही नियोजन करण्यात आले आहे. वाढत्या आवकेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.