पावसाच्या दडीने भातशेतीला मोठा फटका! खेडमध्ये उत्पादनात ७० टक्क्यांपर्यंत घट; इंद्रायणी तांदूळ १४ हजार रुपये क्विंटलवर जाण्याची शक्यता
एपीएमसी न्यूज नेटवर्क : पावसाने ऐन हंगामात पाठ फिरवल्याने पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भातशेतीला मोठा फटका बसला आहे. यंदा भाताच्या उत्पादनात तब्बल ६० ते ७० टक्क्यांची घट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. उत्पादन घटल्याचा परिणाम आता तांदळाच्या बाजारभावावरही होण्याची शक्यता आहे. खवय्यांच्या विशेष पसंतीचा इंद्रायणी तांदूळ यंदा प्रतिक्विंटल १२ ते १४ हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भात हे प्रमुख पीक असून, हजारो शेतकऱ्यांचे आर्थिक गणित या पिकावर अवलंबून आहे. मात्र, यंदा गणेशोत्सवानंतर भाताच्या पिकाला पाण्याची सर्वाधिक गरज असताना पावसाने दडी मारली. त्यामुळे भाताच्या साळी व्यवस्थित भरू शकल्या नाहीत. परिणामी, अपेक्षित उत्पादनाच्या तुलनेत केवळ ३० ते ४० टक्केच उत्पादन हाती येत असल्याचे चित्र आहे. सिंचनाची सुविधा असलेल्या मोजक्या शेतकऱ्यांचा अपवाद वगळता बहुतांश शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. काही शेतकऱ्यांवर तर भाताऐवजी केवळ पेंढा कापून घेण्याची वेळ आली आहे. सध्या परिसरात भात कापणीला वेग आला आहे.
दर वाढले, पण विक्रीसाठी भातच नाही!
भाताच्या साळीला यंदा चांगला दर मिळत असला, तरी उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी पुरेसा माल उपलब्ध नाही. गतवर्षी भाताच्या साळीला प्रतिकिलो ३० ते ३५ रुपये दर मिळत होता. यंदा तुटवड्यामुळे व्यापाऱ्यांकडून प्रतिकिलो ५० ते ५५ रुपये दर दिला जात आहे. मात्र, वाढीव दर असूनही शेतकरी विक्रीसाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे.
“यंदा उत्पादन इतके कमी झाले आहे की, शेतकऱ्यांना स्वतःच्या कुटुंबासाठी वर्षभर पुरेल एवढा तांदूळ साठवून ठेवणेही कठीण झाले आहे. त्यामुळे विक्रीसाठी माल शिल्लक राहिलेला नाही,” अशी प्रतिक्रिया शिवे येथील प्रगतशील शेतकरी विनायक शिक्रे यांनी दिली.
भात गिरणी व्यावसायिकही संकटात
शेतकऱ्यांकडून भाताच्या साळीची आवक जवळपास थांबल्याने भात गिरणी व्यवसायालाही मोठा फटका बसत आहे. कच्चा माल उपलब्ध नसल्याने गिरण्यांचे कामकाज अडचणीत आले आहे. यंदाच्या हंगामात भात गिरणी व्यवसायासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिल्याची माहिती कडूस येथील गिरणी व्यावसायिक गणेश शिक्रे यांनी दिली.
आकडेवारीतून उत्पादनातील घसरण स्पष्ट
यंदा खेड तालुक्यात सुमारे ८ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली होती. सामान्यतः एका हेक्टरमधून सुमारे २३ क्विंटल भाताचे उत्पादन मिळते. मात्र, यंदा हे उत्पादन घसरून अवघ्या ६ क्विंटलपर्यंत आले आहे. म्हणजेच नेहमीच्या तुलनेत उत्पादनात सुमारे ७० टक्क्यांची घट झाली आहे.
ही आकडेवारी कृषी विभागाने दिली असून, पावसाच्या अनियमिततेचा भातशेतीवर झालेला परिणाम यातून स्पष्ट होतो.
— वैभव विशे, कृषी अधिकारी