कांद्याची दरात वाढ ;नवीन लाल कांद्याची आवक वाढण्यासाठी महिनाभराची प्रतीक्षा; गृहिणींचे बजेट कोलमडले!
नाशिक : दिवाळीनंतर कांद्याचे बाजार पुन्हा सुरू होताच कांद्याच्या दरातील तेजी कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. घाऊक बाजारात नवीन लाल पोळ कांद्याला सरासरी ४,७०० रुपये, तर उन्हाळ कांद्याला ३,८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. मात्र, नवीन लाल कांद्याची आवक अद्याप मर्यादित असून, ती वाढण्यासाठी आणखी महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे तोपर्यंत कांद्याचे दर चढेच राहण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.
दीपावलीनिमित्त जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज आठ ते दहा दिवस बंद होते. त्यानंतर आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू झाले. पहिल्याच दिवशी नवीन लाल कांद्याची १,००२ क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमाल ५,४२१ रुपये, किमान २,००१ रुपये, तर सरासरी ४,७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. दुसरीकडे उन्हाळ कांद्याची १,११६ क्विंटल आवक झाली असून, त्याला कमाल ४,३५३ रुपये, किमान २,००१ रुपये आणि सरासरी ३,८०० रुपये दर मिळाला.
पावसाअभावी उत्पादनाला फटका
पिंपळगाव बसवंत बाजार समितीतही दिवाळीनंतर नवीन लाल पोळ कांद्याची आवक सुरू झाली आहे. येथे नवीन कांद्याला सरासरी ४,४०० रुपये, तर उन्हाळ कांद्याला ४,००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात पावसाअभावी पिकांचे नुकसान झाले. त्याचा फटका कांदा उत्पादनालाही बसला आहे. जुना उन्हाळ कांदा संपत असताना नवीन लाल कांद्याची आवक बाजारातील मागणीच्या तुलनेत कमी आहे. नवीन कांदा मुबलक प्रमाणात बाजारात येण्यासाठी आणखी महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत कांद्याचे दर कायम राहतील, असा अंदाज लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी व्यक्त केला.
किरकोळ बाजारात कांदा ८० रुपयांवर महानगरांत शंभरी!
घाऊक बाजारात कांद्याचे दर प्रतिकिलो ३८ ते ४८ रुपयांच्या दरम्यान आहेत. मात्र, वाहतूक खर्च, व्यापाऱ्यांचा नफा आणि अन्य खर्चाची भर पडल्याने किरकोळ बाजारात कांदा ७० ते ८० रुपये किलोने विकला जात आहे. नाशिकसारख्या कांद्याचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या जिल्ह्यातच ग्राहकांना महाग कांदा खरेदी करावा लागत आहे. महानगरांमध्ये कांद्याने शंभरी गाठली आहे. वाढत्या दरामुळे गृहिणींच्या महिन्याच्या बजेटला फटका बसत असून, ग्राहकांनी खरेदीचे प्रमाणही कमी केले आहे. पूर्वी पाच किलो कांदा खरेदी करणारे ग्राहक आता एक ते दोन किलोवर आले असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
िर्यातीसाठी उन्हाळ कांद्यालाच पसंती
कांद्याचे दर साडेतीन ते साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान असल्याने काही प्रमाणात निर्यात सुरू आहे. मात्र, नवीन लाल कांदा ओलसर असल्याने त्याचे टिकण्याचे आयुर्मान कमी असते. त्यामुळे निर्यातीसाठी प्रामुख्याने जुन्या उन्हाळ कांद्यालाच पसंती दिली जात आहे, अशी माहिती लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली.
नवीन लाल कांद्याची आवक वाढल्यानंतरच बाजारातील दर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे लक्ष आता पुढील महिन्यातील कांद्याच्या आवकेकडे लागले आहे.