309 शेतकऱ्यांचे सोयाबीन लाटले; ढवळे पिता-पुत्रांचा कोट्यवधींचा गंडा!
१० हजार क्विंटल सोयाबीनचा साठा प्रशासनाकडून सील ८० वर्षीय वृद्ध महिलेचीही १३.५० लाखांची फसवणूक, जानेफळ पोलिसांत गुन्हा दाखल
बुलढाणा : आधीच दुष्काळ आणि नापिकीच्या संकटाने शेतकरी आर्थिक अडचणीत असताना बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन खरेदीच्या नावाखाली शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा परिसरातील तब्बल ३०९ शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करून त्याचे पैसे न देता व्यापारी कैलास ढवळे आणि त्याचा मुलगा आशिष ढवळे यांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जानेफळ पोलीस ठाण्यात पिता-पुत्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, प्रशासनाने टेंभुर्णा येथील बुलढाणा अर्बन वेअरहाऊसमधील तब्बल १० हजार क्विंटल सोयाबीनचा साठा सील केला आहे.
८० वर्षीय महिलेची १३.५० लाखांची फसवणूक!
या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे ८० वर्षीय झोंगाबाई चव्हाण यांचाही आरोपींनी विश्वास संपादन करून गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. झोंगाबाई यांच्याकडून २२२ क्विंटल सोयाबीन प्रतिक्विंटल ६ हजार ५०० रुपये दराने खरेदी करण्यात आले. त्यापोटी ९३ हजार रुपये रोख देण्यात आले, तर उर्वरित १३ लाख ५० हजार रुपये महिनाभरात देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, मुदत उलटून गेल्यानंतरही पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली. अखेर आरोपींनी गाव सोडल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच झोंगाबाई यांनी पोलिसांत धाव घेतली.
३०९ शेतकऱ्यांचे लाखो रुपये थकवले!
झोंगाबाई यांच्याप्रमाणेच परिसरातील अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीचे पैसे मिळाले नसल्याचे समोर आले आहे. काही शेतकऱ्यांची थकीत रक्कम लाखोंच्या घरात आहे.
जिजाबाई अल्हाट ₹२,३८,९३६,मोहन आमले ₹२,००,०००,तुळशिराम माडोकार ₹९,३५,०००,बळीराम राठोड ₹३३,६४,६३६ ा आकडेवारीवरून शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीची भीषणता स्पष्ट होते. मात्र, सर्व ३०९ शेतकऱ्यांची एकूण थकीत रक्कम किती, याचा अधिकृत तपशील अद्याप समोर येणे बाकी आहे.
१० हजार क्विंटल सोयाबीनचा साठा सील!
फसवणुकीचे प्रकरण समोर आल्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली करत टेंभुर्णा येथील बुलढाणा अर्बन वेअरहाऊसमध्ये साठवलेला सुमारे १० हजार क्विंटल सोयाबीनचा साठा सील केला. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाच्या मोबदल्यात काहीतरी दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र, हा साठा नेमका किती शेतकऱ्यांच्या मालाचा आहे, त्याची अधिकृत मोजणी कशी होणार आणि प्रत्येक शेतकऱ्याला किती रक्कम मिळणार, याबाबत प्रशासनाकडून स्पष्टता येणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांचा सवाल : आमच्या घामाचे पैसे कधी मिळणार?
दुष्काळ, वाढता उत्पादन खर्च आणि शेतीमालाच्या बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकरी आधीच संकटात आहेत. त्यात माल विकूनही पैसे मिळत नसतील, तर शेतकऱ्यांनी जगायचे कसे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. सील केलेल्या सोयाबीनची पारदर्शक पद्धतीने मोजणी करून संबंधित शेतकऱ्यांची नोंद निश्चित करावी आणि त्यांच्या थकीत रकमेचा परतावा द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
पोलिसांची कारवाई, वेअरहाऊसमधील सोयाबीनचा साठा सील मात्र ३०९ शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांची वसुली कधी होणार? हा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा आहे.