मुंबई APMCमध्ये स्वच्छतेचा बोजवारा! कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग, पार्किंगमधील गाडी जळण्यापासून थोडक्यात बचाव!
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा बाजारपेठेला फटका सेंट्रल फॅसिलिटी क्रमांक २ मध्ये अग्नितांडवाचा धोका, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असताना संपूर्ण बाजार आवारात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून दुर्गंधीमुळे व्यापारी, कामगार आणि बाजारात येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच सेंट्रल फॅसिलिटी क्रमांक २ मधील पार्किंग परिसरात असलेल्या कचराकुंडीला आग लागल्याची घटना घडली. या आगीची झळ बाजूला पार्क केलेल्या एका गाडीपर्यंत पोहोचली. मात्र, अग्निशमन दलाचे जवान वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आली आणि मोठा अनर्थ टळला.
विशेष म्हणजे, सेंट्रल फॅसिलिटी क्रमांक २ ही संपूर्ण व्यावसायिक इमारत असून तिच्या आवारात मोठ्या प्रमाणात वाहनांची पार्किंग केली जाते. कचराकुंडीला लागलेली आग शेजारील वाहनांपर्यंत पसरली असती, तर पार्किंगमधील अनेक गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची भीती होती. दिवाळीच्या सणाच्या काळात ही घटना घडल्याने बाजारातील अग्निसुरक्षा आणि स्वच्छता व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्वच्छता अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाचा आरोप!
बाजार आवारातील कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संबंधित स्वच्छता विभागाची असताना अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप व्यापारी आणि बाजार घटकांकडून केला जात आहे. कचराकुंड्यांची नियमित साफसफाई, कचऱ्याची वेळेत विल्हेवाट आणि पार्किंग परिसरातील सुरक्षितता याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे संबंधित स्वच्छता अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दिवाळीत व्यापाऱ्यांची पूजा, पण बाजारात दुर्गंधी!
एकीकडे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर व्यापारी आपापली दुकाने आणि गाळे स्वच्छ करून लक्ष्मीपूजनाची तयारी करत आहेत. मात्र, दुसरीकडे संपूर्ण बाजार आवारात कचऱ्याचे ढीग आणि अस्वच्छतेमुळे दुर्गंधी पसरली आहे. सणासुदीच्या काळात देशभरातून व्यापारी, शेतकरी आणि ग्राहकांची मोठी वर्दळ असलेल्या मुंबई APMCमध्ये स्वच्छतेची अशी दुरवस्था होणे ही गंभीर बाब मानली जात आहे.
वाहनधारकांनो, पार्किंग करताना सावधान!
सेंट्रल फॅसिलिटी क्रमांक २ मधील घटनेनंतर पार्किंगमध्ये वाहन उभे करणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचराकुंड्यांच्या अगदी जवळ वाहने पार्क केल्यास अशा आगीच्या घटनांमध्ये वाहनांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे वाहनधारकांनी कचराकुंड्यांपासून सुरक्षित अंतरावर वाहने पार्क करावीत, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेऊन APMC प्रशासनाने तातडीने संपूर्ण बाजार आवारातील कचरा हटवावा, कचराकुंड्यांची नियमित स्वच्छता करावी, पार्किंग परिसरातील अग्निसुरक्षा तपासावी आणि स्वच्छता व्यवस्थेतील हलगर्जीपणाची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.
दिवाळीच्या सणात बाजारपेठेला स्वच्छतेचा अभाव आणि आगीचा धोका आता तरी APMC प्रशासन जागे होणार का? हा खरा प्रश्न आहे.