भरदिवसा पिस्तूलचा धाक दाखवून ज्वेलर्स लुटणारी टोळी गजाआड; १ कोटींचा मुद्देमाल हस्तगत
नवी मुंबई:  भरदिवसा शस्त्राचा धाक दाखवून ज्वेलर्स लुटणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलिसांनी गजाआड केले असून नवी मुंबई पोलिसांनी राजस्थानमधून आरोपींना ताब्यात घेतले आहे. या टोळीने 11 नोव्हेंबरला नवी मुंबई घणसोलीतील अंबिका ज्वेलर्स वर दरोडा टाकला होता. ज्वेलर्सचे मालक व कामगाराच्या तोंडात बोळा कोंबून बाथरूममध्ये बंद करून हि लूट केली होती. चोरटे मूळचे राजस्थान मधले असून पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्या कडून 1 किलो 965 ग्राम सोन्याचे व 21 किलो 452 ग्राम चांदीचे दागिने असलेला एकूण 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गुन्ह्यात अटक केलेले आरोपी प्रकाशचंद्र सोहनलाल गुर्जर (२४), मोतीलाल किशनलाल गुर्जर (३२), कन्हयालाला उर्फ कान्हा भुमराज जाट (२३), दिपक रुपजी गायरी (२३) आणि शंकरलाल उर्फ संपत माधवलाल जाट (३०) हे पाचही आरोपी राज्यस्थान मधील राजसमंद जिल्ह्यातील आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास नवी मुंबई गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह भोसले करत आहेत.
घणसोली येथील अंबिका ज्वेलर्सवर भरदिवसा दरोड्याची घटना १४ नोव्हेंबरला घडली होती. या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, १५ दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर नंतर ५ जणांना अटक करण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपींमध्ये दोन व्यक्ती याच व्यवसायातील कारागीर असून उर्वरित अट्टल गुन्हेगार आहेत. आयुक्त बिपीनकुमार सिंग,पोलीस सहआयुक्त डॉ जय जाधव ,अपर पोलिस आयुक्त गुन्हेशाखा महेश धुर्य व गुन्हे उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई गुन्हे शाखेच्या १८ ते २० कर्मचाऱ्यांचे पथक यांनी दिवसरात्र तपास करून हि कामगिरी फत्ते केली. जवळपास ७०० सीसीटीव्हीचे परीक्षण करून आरोपींना राजस्थान येथून जेरबंद केले. तर नवी मुंबई गुन्हे शाखेची २०२१ मधील सर्वात मोठी कामगिरी असल्याचे बोलले जात आहे.