पाणी मुबलकतेने जिल्ह्यात १००% उन्हाळी पेरण्या
उन्हाळी हंगामातील पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यंदा पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी आहे. त्यामुळे पेरणीच्या क्षेत्रात काही प्रमाणात वाढ झाली आहे. पुणे विभागात आतापर्यंत सरासरी क्षेत्राच्या १९ हजार २७३ हेक्टरपैकी १९ हजार ४६८ हेक्टर म्हणजेच १०१ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यात प्रामुख्याने उन्हाळी बाजरी, मका, भुईमूग या पिकांच्या समावेश आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
मागील काही वर्षांपासून उन्हाळ्यात चाराटंचाईचा मोठा प्रश्न उद्भवत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात चारा पिकांची पेरण्याकडे वळू लागले आहे. परिणामी, विभागात उन्हाळी पिकाच्या क्षेत्रात घट होत आहे. गेल्या वर्षी काही भागांत जोरदार झालेल्या पावसामुळे पिकांचे चांगलेच नुकसान झाले. त्यामुळे रब्बीच्या उशिराने पेरण्या झाल्या. सध्या पुणे विभागात पाण्याची परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी पेरण्यांवर भर दिला आहे. विभागात उन्हाळी मक्याची ७१२२, बाजरी २२६७, उन्हाळी मूग ४१७, भुईमूग ७३२५, तर सोयाबीनची २२२२ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
नगर जिल्ह्यात रब्बी हंगामातील गहू पिकांची काढणीस सुरुवात झाली आहे. जिल्ह्यामध्ये उन्हाळी हंगामातील उन्हाळी मका व भुईमूग पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामातील गहू पिके पक्वतेच्या अवस्थेत आहे. हंगामातील उन्हाळी बाजरी व भुईमूग पिकाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्यात रब्बी हंगामातीलगहू पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. उन्हाळी हंगामातील उन्हाळी मका व भुईमूग पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, माळशिरस या तालुक्यांत बऱ्यापैकी पेरण्या झाल्या आहेत.