स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या 41 व्या पुण्यतिथीला राज्य सरकारच्या एकही नेत्याला निमंत्रण नाही-नरेंद्र पाटील
नवी मुंबई, दि. २३ :- सध्या माथाडी कामगार चळवळीची दिशा वाईट अवस्थेत आहे याचे मलाही खंत वाटते, मी ही कुठेतरी कमी पडतोय असे मला वाटते, आजपर्यंतच्या सरकारकडून माथाडी कामगारांच हित कुठे जल गेलं, आणि म्हणूनच यावेळच्या स्व. आमदार अण्णासाहेबांच्या ४१ व्या पुण्यतिथीच्या सभेला एकाही लोक प्रतिनिधीला बोलावण्याची इच्छा झाली नाही. सध्या माथाडी कामगारांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. बोर्ड उदध्वस्त होत आहेत. बोर्डामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. बाजार समितीचे काम अन्यत्र हलविले जाते पण सरकारला याची तमा नाही. आतापर्यंत बहुतेक कामगार मंत्री हे उदयोगपतीच होते आणि आताचेही आहेत मग कामगारांना न्याय कसा मिळणार अशी खंत संघटनेचे सरचिटणीस व   अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली. ते अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त माथाडी भवन, वाशी येथील माथाडी कामगारांच्या भव्य सभेमध्ये बोलत होते. पुढे   म्हणाले की, अण्णासाहेबांनी केलेल्या ऐतिहासिक माथाडी कायद्याचे उदाहरण सभागृहात कामगारांसंदर्भात कोणताही कायदा पास करताना दिले जाते हेच खरे अण्णासाहेबांच्या अभेद्य चळवळीचे यश आहे. म्हणूनच आपण सर्वांनी संघटित होवून माथाडी कामगार चळवळीसमोर आता जी ज्वलंत आव्हाने उभी आहेत ती नष्ट करण्यासाठी आपल्या संघटनेची ताकद अधिक बळकट करण्याची गरज आहे.
यानंतर बोलताना संघटनेचे कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, माथाडी कामगार चळवळ अत्यंत वाईट दिशेने आणि रस्त्याने वाटचाल करीत आहे त्यासाठी ती बदलण्याकरीता आपण सगळयांनी एकजुटीने प्रयत्न करायला पाहिजेत. अण्णासाहेबांच्या ऐतिहासीक चळवळीचे अस्तित्व टिकवायचे असेल तर आपली अभेद्य एकजूट कायम राहिली पाहीजे असेही आव्हान त्यांनी उपस्थित कामगारांना केले. ते पुढे असे म्हणाले की, १९८२ साली महाराष्ट्रात अण्णासाहेबांच्या चळवळीचे मोठे वादळ निर्माण झाले. अनेक समाज्याच्या नेत्यांनी संघटना उभ्या केल्या मात्र अण्णासाहेबांनी मराठा समाजाची संघटना उभी करुन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात क्रांती घडविली त्याचे पडसाद ग्रामीण भागात मोठया प्रमाणात पसरले. अण्णासाहेबांची लढाई लोकांच्या प्रश्नांसाठी होती. त्याकाळी अण्णासाहेबांनी पेटविलेल्या वातीचा आज ज्वालामुखी झाला, विशेष म्हणजे अण्णासाहेबांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्यानंतर मंडळाच्या कार्याला चालना व गती देण्याचे काम त्यांनी केले. जवळपास ७० हजार उद्योजक निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. पुढे ते असेही म्हणाले की, विषयांसी आणि विचारांशी ठाम असलेला एकच नेता म्हणजे अण्णासाहेब पाटील मराठा समाजासाठी आहुती देणाऱ्या या महान नेत्याला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी सर्वांच्या वतीने श्रध्दांजली आपर्ण करतो आणि अभिवादन ही करतो.
या कार्यक्रमात अण्णासाहेबांना भावपुर्ण आदरांजली वाहताना संघटनेचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप म्हणाले की, आजचा दिवस हा दुःखद घटनेचं स्मरण करुन देणारा आहे. तरी अण्णासाहेबांच्या महान कार्याला आपण सर्वांनी अभिवादन करणे हे महत्वाचे आहे. २२ मार्च रोजी मराठा समाजाच्या अनेक मागण्या मान्य करुन घेण्यासाठी अण्णासाहेबांनी आझाद मैदान येथे ऐतिहासिक मोर्चा नेला होता. आर्थिक निकषावर आधारीत आरक्षण द्यावे तसेच मराठा समाजाच्या विविध मागण्या मान्य कराव्यात अशा त्यांच्या मागण्या होत्या. त्यावेळी हे धाडसाचे काम अण्णासाहेबांसारख्या नेत्यानी केले. त्यांनी हमालाचा माथाडी कामगार केला आणि ऐतिहासिक माथाडी कामगार करण्यासाठी भाग पाडले म्हणूनच ते माथाडी कायद्याचे जनक ठरले. त्यांनी तळागाळातील कामगारांसाठी कायदा केलेली चळवळ आजही जिवंत आहे म्हणूनच अण्णासाहेबांसारख्या अलौकिक नेतृत्वाला आजच्या त्यांच्या पुण्यतिथिनिमित्त आपणा सर्वांना ही चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आपली बलाढय एकजूट अशीच ठेवूया असे उपस्थित कामगारांना आवाहनही केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघटने जनसंपर्क अधिकारी व संयुक्त सरचिटणीस पोपटराव देशमुख यांनी केले. या कार्यक्रमास संघटनेचे अध्यक्ष, एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस रविकांत पाटील, ऋषिकांत शिंदे, दिलीप खोंड, संघटनेच्या कायदेशीर सल्लागार अॅङ भारतीताई पाटील, पतपेढीचे व्यवस्थापकीय संचालक रमेश अण्णासाहेब पाटील, संघटनेचे उपाध्यक्ष सुर्यकांत पाटील, सेक्रेटरी मनोज जामसुतकर, व्यापारी प्रतिनिधी मयूरभाई सोनी, राजपुरे मा. नगरसेवीका शुभांगी पाटील, शशिकला पाटील, बीडचे रवि शिंदे आदि मान्यवर व माथाडी कामगार कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.