‘विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम, त्यांची बोलती बंद’, अर्थसंकल्पावर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
 
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत आज अर्थसंकल्प (Maharashtra Budget) सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. पण या घोषणांवर विरोधकांनी टीका केली. फडणवीस यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या असल्या तरी त्यांची अंमलबजावणी कितपत होते याबाबत विरोधकांच्या मनात शंका आहे. विशेष म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा अर्थसंकल्प म्हणजे गाजरता हलवा आहे, अशी टीका केली. त्यांच्या या टीकेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्न विचारला असता त्यांनी ठाकरेंच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिलं.
खरं म्हणजे गाजर हलवा तरी आम्ही देतोय. त्यांनी काहीच दिलं नाही. त्यांनी स्वत: खाललं, दुसऱ्याला उपाशी ठेवलं. मी त्याच्यात जात नाही. आम्ही जो अर्थसंकल्प मांडलेला आहे तो वस्तुनिष्ठ आहे. याचे परिणाम तुम्हाला दृश्य स्वरुपात दिसतील. कामं सुरु होतील. आकडे फुगवण्यासाठी आम्ही हे केलेलं नाही. आम्ही फक्त कोरडी आश्वासनं दिलेली नाहीत. तर शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेलो आहोत”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
यावेळी पत्रकारांनी शेतकऱ्यांसाठी वीजबिल माफी करण्याबद्दल काही निर्णय झाला नसल्याचं विचारलं, त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, “वीजबिल माफीचं काय? मागच्यावेळेस अधिवेशनात घोषणा केली. पण अधिवेशनानंतर वीज कापली. असं आमचं सरकार करणार नाही. स्वत: उपमुख्यमंत्री त्या खात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही. या शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम सरकारने केलेलं आहे.”