खरेदी केंद्रावरील अटी-नियम शेतकऱ्यांच्या मुळावर; शेतकऱ्यांपुढे गंभीर प्रश्न
एक ना अनेक संकटावर मात करुन शेतकरी उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. पण कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी खरेदी केंद्रावरील अटी-नियम हे शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहे. आता रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी आणि गव्हाच्या काढणीला वेग आला आहे. हरभरा पिकासाठी राज्यभर हमीभाव केंद्र उभारण्यात आली आहेत. एवढेच नाही तर प्रत्यक्ष पीक खरेदीलाही सुरवात झाली असून केंद्रावरील नियम-अटींमुळे या खरेदी केंद्राचा उद्देश तरी साध्य होणार की नाही अशी स्थिती आहे. पोषक वातावरणामुळे हरभऱ्याची उत्पदकता वाढली आहे. यासंदर्भात कृषी विभागानेच अहवाल सादर केला आहे. असे असताना केंद्रावर खरेदीची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात तर हेक्टरी केवळ 6 क्विंटल 50 किलोची मर्यादा घालून देण्यात आली आहे. तर हेक्टरी उतारा मात्र, 13 ते 14 क्विंटलचा आहे. त्यामुळे उर्वरीत हरभऱ्याचे करायचे काय असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे नाफेडच्यावतीने उभारण्यात आलेल्या या खरेदी केंद्रावर सुविधांपेक्षा अडचणी अधिक अशीच अवस्था झाली आहे.
राज्यभर हरभरा खरेदी केंद्र सुरु
हरभऱ्याला किमान आधारभूत दर मिळावा याअनुशंगाने नाफेडच्यावतीने राज्यभर खरेदी केंद्र उभारण्यात आली आहेत. खुल्या बाजारातील घसरलेले दर यामुळे केंद्राशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. असे असले तरी संपूर्ण मालाची विक्री ही खरेदी केंद्रावर करता येणार नाही. 1 मार्च पासून नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा हरभरा घेण्यास सुरवात करण्यात आली आहे. शिवाय शेतकऱ्यांची नोंदणीही होत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 18 खरेदी केंद्र उभारण्यात आली असून 1 हजार 366 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. नियम-अटींमध्ये शिथीलता मिळाली तर ही नोंदणी वाढणार आहे.
खरेदी केंद्रावरील नियम अटींचा काय होणार परिणाम
उत्पादकतेपेक्षा कमीच हरभऱ्याची खरेदी जर केंद्रावर झाली तर उर्वरीत हरभरा हा खुल्या बाजारातच विकवा लागणार आहे. मुळात खुल्या बाजारात केवळ 4 हजार 600 रुपयांपर्यंतच दर आहेत. तर खरेदी केंद्रावर 5 हजार 230 रुपये दर ठरवून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांची ही अडचण व्यापाऱ्यांच्या लक्षात आली तर मात्र, खुल्या बाजारातील दरात घटच होणार आहे. त्यामुळे खरेदी केंद्रावर एका शेतकऱ्यास किमान 15 क्विंटल हरभरा विक्री करण्याची मुभा असावी अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाकार्यध्यक्ष संजय पाटील यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.
अशी आहे राज्यातील हरभऱ्याची अंदाजित उत्पादकता
दरवर्षी पीक कापणीपूर्वी कृषी विभागाकडून उत्पादकता ठरवली जाते. त्यानुसार पीकाचे नियोजन केले जाते. उत्पादकता ही क्विंटलमध्येच मोजली जाते. यामध्ये परभणी : 8.20, हिंगोली :11.00, नांदेड : 11.50, लातूर : 13.50, उस्मानाबाद: 6.5, बीड: 9.5, जालना:13.00, औरंगाबाद: 5.80, बुलडाणा: 11.80, अकोला : 15.00, वाशिम : 7.00, यवतमाळ: 12.00, अमरावती: 15.60, नागपूर : 15.00, भंडारा: 8.00, गोंदिया: 8.10, चंद्रपूर: 7.50, गडचिरोली 4.7, नाशिक: 9.50, धुळे 10.97, नंदूरबार: 13.96, जळगाव: 13.00, नगर: 7.5, पुणे : 8.60, सोलापूर:6.50, सातारा : 9.25, सांगली: 11.6, कोल्हापूर : 12.00, ठाणे 7.10, पालघर:7.50, रायगड: 4.50 तर रत्नागिरी 4.90 अशी उत्पादकता आहे.