Nashik Crime| 16 कृषी अधिकाऱ्यांचा 147 शेतकऱ्यांना गंडा; शासनालाही 51 कोटींचा चुना, नेमका घोटाळा काय?
नाशिकमध्ये चक्क 16 कृषी अधिकाऱ्यांनी 147 शेतकऱ्यांना गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे त्यांनी शासनालाही सहा वर्षांत सुमारे 50 कोटी 72 लाख 72 हजार 64 रुपयांचा चुना लावला आहे. याप्रकरणी एका शेतकऱ्याने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला तेव्हा सखोल चौकशी सुरू झालीय. एखाद्या चित्रपटाला साजेलसे असे हे सारे प्रकरण आहे.
नेमका घोटाळा काय?
पेठ तालुक्यातील हेदपाड-एकदरे गावाचे शेतकरी योगेंद्र उर्फ योगेश सुरेश सापटे यांनी शासनाच्या विविध योजनांना मंजुरी मिळाल्याचे पाहिले. तशा निविदा निघाल्या. त्यांनी 2011 मध्ये अशा योजनेत कामे मिळावीत म्हणून अर्ज केला. त्यासाठी सापटे यांच्याकडून निविदा भरून घेतली. 100 रुपयांच्या कोऱ्या स्टँपपेपरवर तिकीट लालेल्या कोऱ्या 50 पावत्या तसे कोऱ्या चेकवर सह्या घेण्यात आल्या. या साऱ्याचा गैरवापर केला. सापटे यांना शेतीची कामे दिली. मात्र, त्यांच्या खात्यावरून 2011-2017 या काळात परस्पर 3 कोटी 17 लाख 4 हजार 504 रुपये काढून घेतले. अशाच प्रकारे इतर 147 शेतकऱ्यांना गंडवण्यात आले आहे.
पुरावे केले सादर
कृषी अधिकाऱ्यांनी एकीकडे शेतकऱ्यांना फसवले. दुसरीकडे शासनाच्या विविध योजनांचा निधी फस्त केला. याप्रकरणी शेतकरी सापडे यांनी पेठ येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात दाद मागितली. या घोटाळ्याचे पुरावे सादर केले. तेव्हा न्यायालयाने हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, हा गुन्हा मोठा आहे. त्याला मोठे मनुष्यबळ लागणार आहे. त्याची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे हे प्रकरण आता तपासासाठी नाशिकच्या स्थानिक पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.
यांच्यावर गुन्हे दाखल
कृषी अधिकारी शीलानाथ पवार (रा. मानूर, ता. कळवरण), सरदारसिंग राजपूत (रा. चाळीसगाव, जि. जळगाव), एम. बी. महाजन (रा. ता. पेठ), अशोक घरटे (रा. सागुडे, जि. धुळे), विश्वनाथ पाटील (रा. परधाडे, जि. जळगाव) यांचा समावेश आहे. कृषी सहायकांमध्ये राधा सहारे (रा. कुकडणे, ता. सुरगाणा), प्रतिभा माघाडे (रा. दिंडोरी) यांचा समावेश आहे. कृषी पर्यवेक्षकांमध्ये किरण कडलग (रा. जवळे कडला, ता. संगमनेर), मुकुंद चौधरी (रा. उंबरी, ता. राहुरी), दिलीप वाघचौरे (रा. सोलापूर) यांचा समावेश आहे. अन्य संशयितांमध्ये दिलीप फुलपगार, दीपक कुसळकर, विठ्ठल रंधे, संजय पाटील, नरेश पवार, दगडू पाटील यांचा समावेश आहे. या साऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.