शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपये देणार, पीक विम्याचा हप्ता सरकार देणार; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
मुंबई:देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून पहिलाच अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात पीक विमा घेता येणार आहे. राज्य सरकारच शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा हप्ता भरेल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर वर्षाला 12 हजार रुपये प्रत्येकी देण्यात येणार आहे, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प मांडला. अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प आहे. ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित हा अर्थसंकल्प आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा आणि पर्यावरणपूरक विकास आदी ध्येयांवर हा अर्थसंकल्प आधारीत असेल असं देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं.
अर्थसंकल्पातील घोषणा
प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर
नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार
केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार
या योजनेचा 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ
6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार
3 वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणणार
1000 जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन करणार
डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्तीवाढ
3 वर्षांत 1000 कोटी रुपये निधी
नागपुरात कृषी सविधा केंद्र, विदर्भात संत्राप्रक्रिया केंद्र
नागपुरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करणार
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार हा उद्देश
या केंद्रासाठी 228 कोटी रुपये देणार
नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल, कळमेश्वर, अमरावती जिल्ह्यात मोर्शी, बुलढाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र /20 कोटी रुपये तरतूद
शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकर्यांना निवारा-भोजन
कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणार्या शेतकर्यांना सुविधा
शेतकर्यांच्या मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन
जेवणासाठी शिवभोजन थाळीची उपलब्धता
गड किल्ले संवर्धन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये
आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान: 50 कोटी
मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने : 250 कोटी रुपये
शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय. शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन : 300 कोटी रुपये