पुण्यातील मुकादम हत्येमागील गुन्हेगार आणि षडयंत्र रचणाऱ्यांना शिक्षा मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही: प्रविण दरेकर
सत्ता अनेक पक्षांच्या आल्या पण माथाडी कामगार अभेद राहून एकजूट अबाधित राहिली ती फक्त अण्णासाहेबांच्या कार्यामुळे!, कष्ट करणा-या माणसाला सन्मान देण्याचे काम अण्णासाहेबांनी केलं, सत्ता कुणाचीही असो पण माथाडी कामगार आपल्या न्याय हक्कांसाठी सतत जागृत राहिला हे अण्णासाहेबांच्या कार्याच ज्वलंत उदाहरण असल्याचे गौरउद्गार विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आपल्या भाषणात काढले.
माथाडी कामगार आणि मराठा चळवळीसाठी आज मोठ्या दुःखाचा दिवस आहे. ज्या अण्णासाहेबांनी माथाडी कामगारांना सन्मान दिला, प्रतिष्ठा मिळून दिली. त्यांचा आदरपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अण्णासाहेबानंतर नरेंद्र पाटील यांनी भावनिक न होता माथाडी कामगारांच्या प्रगतीसाठी काम केले पाहिजे हा विश्वास आपल्या कार्यातून दाखवला आहे. तर देवेंद्र फडणवीस आणि मी माथाडी चळवळीच्या मागे ताकदीने उभे आहोत असा विश्वास विधान परिषद विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी यावेळी दिला.
माथाडींच्या समस्या दूर करण्यासाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करू असेहि ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले. पुणे येथील टाटा मोटर्स या ठिकाणी झालेल्या मुकादम हत्येमागील धागेदोरे शोधून काढून गुन्हेगार आणि षडयंत्र रचणाऱ्यांना शिक्षा मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा इशाराही त्यांनी या प्रकरणातील गुन्हेगारांना दिला आहे.
स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांची पुण्यतिथी तसेच माथाडी कामगारांच्या ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन माथाडी भवन येथे करण्यात आले होते. मुंबई एपीएमसी माथाडी भवन येथे स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांची ४० वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या प्रसंगी विधान परिषद विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर, आमदार गणेश नाईक, शशिकांत शिंदे, माथाडी नेते नरेंद्र पाटील, माजी खासदार संजीव नाईक, युनियनचे अध्यक्ष, एकनाथ जाधव, पतपेढीचे व्यवस्थापकीय संचालक रमेश अण्णासाहेब पाटील, युनियनचे संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, ऋषिकांत शिंदे, रविकांत पाटील, दिलिप खोंड, संघटनेचे उपाध्यक्ष सुर्यकांत पाटील, कायदेशिर सल्लागार अॅड भारतीताई पाटील, माथाडी हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. हणमंतराव अण्णासाहेब पाटील, मुंबईचे माजी नगरसेवक व सचिव मनोज जामसुतकर, शुभांगी पाटील, शशिकला पाटील तसेच मुकादम, कार्यकर्ते व माथाडी कामगार उपस्थित होते.
स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी २३ मार्च १९८२ रोजी मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून विधानभवनावर मोर्चा काढला होता. तसेच याच दिवशी   संध्याकाळी ७ वाजता आपल्या आयुष्याचे बलिदान त्यांनी दिले. माथाडी कामगारांमध्ये वाईट प्रवृत्ती वाढत चालली आहे. न काम करता पैसे घेणे, माथाडी कायद्याच्या नावाखाली खंडणी गोळा करणे, पुणे येथील टाटा मोटर्स मध्ये एक मुकादमाची हत्या झाली. या सर्व विषयांवर या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याचे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी सांगितले. तसेच माथाडी कामगारांमध्ये जी गुंडगिरी प्रवृत्ती सुरु आहे. तिला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्या सॊबत संयुक्त बैठक लावण्यात येईल असे पाटील म्हणाले.