Wheat: गव्हाला वाढत्या तापमानाचा फटका सरकारच्या विक्रीमुळं दरात घसरण

Wheat: गव्हाला वाढत्या तापमानाचा फटका सरकारच्या विक्रीमुळं दरात घसरण
गव्हाचे भाव कमी करण्यासाठी भारतीय अन्न महामंडळानं १३ लाख टन गहू विकला. आणखी ११ लाख ७२ हजार टनांचा लिलाव होणार आहे.
नवी मुंबई : गव्हाचे दर कमी करण्यासाठी सरकारनं खुल्या बाजारात गहू विक्री सुरु केली. सरकार २५ लाख टन गहू विकणार आहे. सरकारनं गव्हाची किंमतही कमी केली. त्यामुळं बाजारात गव्हाच्या दरात मोठी घसरण झाली.त्यातच पुढील महिन्यापासून रब्बीतील गहू बाजारात येईल. गहू पिकाला आतापासूनच काही ठिकाणी उन्हाचा फटका बसत आहे. तर सरकारलाही गव्हाची खरेदी वाढवावी लागेल.त्यामुळं यंदाही गव्हाचे दर हमीभावापेक्षा जास्त राहू शकतात,   असा अंदाज मुंबई APMC गहू बाजारातील व्यपाऱ्याने   व्यक्त केला.गव्हाचे भाव कमी करण्यासाठी भारतीय अन्न महामंडळानं १३ लाख टन गहू विकला. आणखी ११ लाख ७२ हजार टनांचा लिलाव होणार आहे.पहिल्या दोन लिलावानंतरही दर अपेक्षेप्रमाणं कमी झाले नव्हते. त्यामुळं सरकारनं गव्हाची आरक्षित किंमत कमी केली.एफएक्यू दर्जाच्या गव्हासाठी २ हजार १५० रुपये प्रतिक्विंटलची किंमत ठरवली आहे. तर इतर गव्हासाठी २ हजार १२५ रुपये दर जाहीर करण्यात आला.कमी केलेली किंमत ३१ मार्च २०२३ पर्यंत असेल, असंही सरकारनं स्पष्ट केलं. विशेष म्हणजे सरकारनं यंदा गव्हासाठी २ हजार १२५ रुपये हमीभाव जाहीर केला.म्हणजेच खुल्या बाजारातील दर हमीभावापर्यंत कमी करण्याचं सरकारनं ठरवलं, असंच म्हणावं लागेल.जानेवारीत देशातील गव्हाचे दर उच्चांकी पातळीवर होते. अनेक बाजारात गव्हाने ३ हजार ३०० रुपयांचा टप्पा गाठला होता. पण सरकारनं खुल्या बाजारात गहू विकल्यानं दर नरमले.
देशात यंदा गव्हाची लागवड वाढूुृन ३४३ लाख हेक्टरवर पोचली. त्यामुळं सरकारनं १ हजार १२१ लाख टन उत्पादनाचा अंदाज जाहीर केला.पण तापमानात सध्या मोठे बदल होत आहेत. त्यामुळं गहू उत्पादनाबाबत चिंता व्यक्त केली जातेय.महत्वाच्या गहू उत्पादक भागांमध्ये किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली. तसचं भारतीय हवामान विभागानंही तापमान वाढेल, असं सांगितलं. यामुळं शेतकऱ्यांसोबत सरकारचीही चिंता वाढली. 
तापमान वाढीचा फटका
तापमानात आचानक वाढ झाल्यानं गहू पिकावर परिणाम जाणवतो, असं उत्तर भारतातील गहू पट्ट्यातील शेतकरी सांगतात.राजस्थान आणि मध्य प्रदेशात काही ठिकाणी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात तापमान ३० अंश सेल्सिअसच्या पार गेले.कृषी शास्त्रज्ञांनीही वाढते तापमान गव्हासाठी ठिक नसल्यचं सांगितलं. तापमानातील वाढ अशीच सुरु राहील्यास राजस्थानमधील काही भागात उत्पादन १५ टक्क्यांपर्यंत कमी राहू शकतं, असं येथील काही संस्थांनी स्पष्ट केलं.
गेल्यावर्षीची पुनरावृत्ती होणार?
मागील हंगामात वाढलेल्या तापमानामुळं गहू उत्पादन घटलं होतं. यंदाही तापमानामुळं गहू पिकाला फटका बसू शकतो.गहू वेळेआधीच पक्व होऊन उत्पादकता कमी राहू शकते, असं कृषी अभ्यासक सांगत आहेत. मार्च महिन्यातही तापमान वाढल्यास सरकारच्या अंदाजापेक्षा उत्पादन कमी राहू शकतं. त्यामुळं गव्हाचे भावही वाढतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.