आता नवी मुंबई महापालिकेसह बाजार समिती किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर!
नवी मुंबई महापालिका आणि मुंबई APMC मार्केटमधील भ्रष्टाचार बाहेर काढू असा इशारा किरीट सोमय्यांनी आज ऐरोली मध्ये दिला. त्यामुळे महापालिका आणि बाजार समितीच्या कंत्राटदार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. तर नवी मुंबई मनपा आणि बाजार समिती मध्ये देखील कोणी यशवंत जाधव असेल तर त्याला बाहेर काढू असा थेट इशाराच किरीट सोमय्या यांनी दिला आहे. या इशाऱ्याने महापालिका आणि बाजार समिती मधील काही आरटीआय कार्यकर्ते सक्रिय झाले असून सोमय्यांना भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची माहिती पुरवण्यात येणार आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या आज दापोली दौऱ्यावर आहेत. महाविकास आघाडी सरकारचे घोटाळे बाहेर काढण्यासाठी निघालेल्या या दौऱ्यात भाजपा कार्यकर्ते जागोजागी किरीट सोमय्या यांचे जंगी स्वागत करत आहेत. जसे इतर घोटाळे बाहेर काढण्यात येत आहेत. तसेच नवी मुंबई महापालिकेतील देखील घोटाळे किरीट सोमय्या यांनी बाहेर काढावे अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे लवकरच सोमय्यांचे 'मिशन नवी मुंबई' सुरु होणार हे निश्चित झाले आहेत.
मागील २ वर्षांपासून नवी मुंबई मनपावर प्रशासक असून प्रशासक व मनपा अधिकारी यांच्यावर दबाव टाकून मोठा गैरव्यवहार नवी मुंबई मनपा मध्ये सुरू आहे. तसेच मुंबई बाजार समिती लुटून आपले खिसे भरण्यात अनेक कंत्राटदार, अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त आहेत. त्यामुळे आपल्याकडे असलेला हथोडा घेऊन आपण लवकरच नवी मुंबई मधील भ्रष्टाचार बाहेर काढावा अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे आता बाजार समितीमधील ६५ कोटींच्या घोटाळ्यासह अनेक घोटाळे बाहेर निघणार असल्याचे सांगण्यात येत आहेत.