टोमॅटोच्या कॅरेटमधून दारूची तस्करी, 15 लाखांचा साठा जप्त
आपल्याला एक जुनी म्हण माहित असेल. अचाट खाणे न् मसणात जाणे. कोणतीही गोष्ट अती केली की, स्वतःसोबतच समाजालाही घातक ठरते. हेच पाहून राज्य उत्पादन शुल्क विभागाने चक्क टोमॅटोच्या कॅरेटमधून दारू वाहतूक करणाऱ्या तस्करांना बेड्या ठोकल्या. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, 15 लाखांचा दारूचा साठाही जप्त करण्यात आला आहे.
अशी केली कारवाई?
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे एक भरारी पथक त्र्यंबकेश्वर येथे गस्त घालत होते. तव्हा त्यांना एका चारचाकी वाहनातून दारूची तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पथकाने सापळा रचला. खबऱ्याने सांगितल्यानुसार एक संशयित चारचाकी वाहन आले. पथकाने ही पिकअप (एम. एच. 48 सी.बी. 0399) गाडी थांबवली. पिकअपमध्ये टोमॅटोचे कॅरेट ठवलेले होते. मात्र, पथकाला संशय आला. त्यांनी सारेच कॅरेट खाली उतरवून तपासणी केली. तेव्हा त्यात दारूचे बॉक्स सापडले. आता ही दारू बनावट आहे की, कशी हे अजून सांगितले नाही. मात्र, बनावट असेल, तर या हातभट्ट्या आणि कंपन्यावरही कारवाई करावी लागेल. अन्यथा विषारी दारूचे बळी जायला वेळ लागणार नाही.
दारूचे 112 बॉक्स जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने या कारवाईत दारूचे 112 बॉक्स जप्त केले. वाहनासाह एकूण 15 लाख 14 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी दीपक राजू नाईक (रा. त्र्यंबकेश्वर) आणि किशोर काशीनाथ मोरे (रा. पंचवटी, नाशिक) या दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई उपायुक्त अर्जुन ओहळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील देशमुक, अरुण चव्हाण, पी. बी. ठाकरू, एम. आर. तेलंग, हेमंत नेहरे, किरण कदम, गोकुळ परदेशी, विजेंद्र चव्हाण, रमाकांड मुंडे यांच्या पथकाने केली.
गुन्हेगारी वाढली
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढल्याचे निदर्शनास येत आहे. मग ते बनावट नोटाप्रकरण असो की, एकाच आठवड्यात झालेले तीन खून असो की जिल्ह्यात गेल्याच महिन्यात पडलेले तीन दरोडे. यामुळे नाशिकच्या शांत प्रतिमेला तडा गेला आहे. पोलिसांनी सक्रिय राहून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात. नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. शहराची अशीच प्रतिमा राहिली, तर उद्योजक इकडे फिरकणारही नाहीत, अशी भीती व्यक्त होत आहे.