मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये चिनी भाजीपाला व्यापार जोमात; शेतकरी आणि बाजार समिती कोमात!
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये गेली काही दिवसांपासून चिनी भाजीपाला मोठ्या प्रमाणात येत आहे. परंतू या भाज्यांचे दर ५० ते १०० रुपये किलो सांगण्यात येत आहे. प्रत्येक्षात मात्र शेतकऱ्याला केवळ २५ ते ३० रुपये किलोचा दर दिला जातो. विशेष म्हणजे या भाजीपाल्याचा साधा भाजीपाला म्हणून बाजार समितीमध्ये नोंद केली जात आहे. त्यामुळे या चिनी भाजीपाल्यावरील लाखो रुपये सेस बुडत असल्याचे दिसत आहे.
ब्रिटन, फ्रान्स आदी देशांमध्ये पिकवली जाणारी रंगबेरंगी शेती आता महाराष्ट्र सुद्धा होऊ लागली आहे. या चिनी भाज्यांमधील अधिक भाजीपाला हा पुणे जिल्ह्यात पिकवला जातो. तर वॅलेंटिना व कॅरोटिना जातीच्या रंगबेरंगी फ्लॉवर नाशिक परिसरात पिकवला जात आहे. भाजीपाला बाजरातील D आणि C पाकळीमध्ये या भाज्यांचा मोठ्या प्रमाणात व्यापार केला जातो. मात्र, याची नोंद बाजार समिती दप्तरी होत नसल्याने हे सुरु असलेले व्यवसाय कोणाच्या आशीर्वादाने सुरु आहेत अशी चर्चा बाजार आवारात सुरु आहे. बाजार समितीकडे संबंधित मालाचे दर मागितले असता अशा कोणत्याही मालाची नोंद बाजार समितीमध्ये नसल्याचे संबंधित अधिकारी सांगत आहेत.
मुंबई बाजार समितीमध्ये या प्रकारचा जवळपास दोन टन माल विक्रीसाठी येतो. सध्या आपल्या देशी भाज्यांना १० ते २० रुपये प्रतिकिलो दर मिळतो, तर या चिनी भाज्यांना मात्र अधिक दर मिळतो. चेरी टोमॅटो १०० रुपये किलो, रंगीत ढोबळी मिरची १२० रुपये, हिरवा कोबी ८० रुपये, जांभळा किंवा लाल कोबी १०० रुपये, आईस बुर्ग प्रक्रारातील कोबी- ६० रुपये, ब्रोकोली ५० रुपये व सॅलरी ६० रुपये प्रतिकिलो या दराने हा भाजीपाला विकला जात आहे.