मुंबई APMC उत्पन्न वाढीच्या दिशेने महत्वाचा निर्णय; अवैध व्यवसायाला बसणार चाप: शशिकांत शिंदे
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह पोलीस प्रशासन व बाजार समिती प्रशासनाची प्रमुख बैठक संपन्न
मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई याच बरोबर कांदिवली, बोरिवली, मालाड इ. ठिकाणी अवैधरीतीने होणाऱ्या फळ, भाजीपाला व कांदा बटाटा व्यवसायावर कारवाई करण्यासाठी बैठक आयोजित केली जावी अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली होती. यानुसार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह पोलीस प्रशासन व बाजार समिती प्रशासन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक पार पडली.
यावेळी शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेला माल कुठंही विकण्यास कुणाची हरकत नाही. मात्र बाजार समित्या अस्तित्वात असताना अनेक व्यापारी फळे, भाजी पाला, कांदा बटाटा आदी वस्तूंची विक्री बाजार समिती बाहेर अवैद्यरित्या करत असल्याचे आढळून आले आहे. याबाबतीत बाजार समिती स्थलांतरानंतर अनेक बैठका झाल्या, कारवाई करण्याचे निर्णय झाले मात्र अवैद्य व्यवसाय सुरू राहीले. यावर त्वरित व कायम स्वरूपी तोडगा काढून हे अवैद्य व्यवसाय बंद करावे, असे अवैद्य रीतीने व्यवसाय करणार्यांवर कारवाई करावी अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी वळसे पाटलांकडे केली.
मागील काही दिवसांपूर्वी कोल्ड स्टोरेज मधून अवैद्यरीतीने होणाऱ्या सफरचंद विक्रीचा दाखला देत त्या पद्धतीने मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई शहर, कंदवली, बोरिवली, मालाड या ठिकाणी होणाऱ्या अवैद्य भाजी-पाला, फळ विक्रीमुळे बाजार समिती मधील व्यापाऱ्यांचे मोठं नुकसान होत असून शेतकऱ्यांना हमखास भाव देणाऱ्या बाजार समित्या बंद पडत आहेत. बाजार समिती मधील काम कमी झाल्याने माथाडी कामगारांना मिळणारा पगार देखील कमी झाला आहे. त्यामुळे राज्यातील पणन व्यवस्था टिकवायची असेल तर ह्या अवैद्य धंद्यांवर कारवाई होऊन ते बंद झाले पाहिजे अशी अपेक्षा बाजारसमितीमधील व्यापारी व कामगार वर्गाची होती. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी शिंदे यांनी हि बैठक घडवून आणली.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तसेच सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी बैठकीमध्ये झालेल्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन अवैद्यरीतीने होणाऱ्या व्यवसायांवर चाप बसवण्यासाठी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन होऊन अवैद्य व्यवसाय करणाऱ्या कोल्ड स्टोरेज वेअरहाऊस बरोबर मार्केटच्या बाहेरील अवैद्य फेरीवाल्यांवर कारवाई करावी असा निर्णय घेण्यात आला. आता नवी मुंबईसह मुंबईत गोरेगाव, बोरिवली, दादर, नागपाडा, भायखळा, कुर्ला आणि मिरा भाईंदर याठिकाणी सुरु असलेला हा व्यापार संतुष्टात येणार आहे. या भागात दररोज २५० ते ३०० भाजीपाला, ते फळांच्या गाड्या थेट मुंबईत जाता होत्या. त्यामुळे दिवसाला २० ते २२ कोटी रुपयांची तर वर्षाकाठी २५० ते ३०० कोटींची उलाढाल होत होती. ही समांतर उलाढाल रोखणे मोठे आव्हान होते. मात्र आजच्या झालेल्या बैठकीनंतर बाजार समितीने उत्पन्न वाढीचेदृष्टीने महत्वाचे पाऊल टाकल्याचे दिसते.
या बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, कामगार विभागाचे आयुक्त सुरेश जाधव, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग, मुंबई सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील, नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक, उपसभापती धनंजय वाडकर, बाजार सदस्य संजय पानसरे, अशोक वाळुंज, शंकर पिंगळे, माजी सदस्य बाळासाहेब बेंडे, बाजार समिती सचिव संदीप देशमुख, उपसचिव महेंद्र म्हस्के आदी मान्यवर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.