टोमॅटो दरात घसरण; टोमॅटो उप्तादक शेतकरी अडचणीत
राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात अनेक शेतकरी बांधव टोमॅटो पिकाची लागवड करतात. पारंपारिक पिकातुन कवडीमोल उत्पन्न प्राप्त होत असल्याने शेतकरी बांधवांनी भाजीपाला वर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करायला सुरुवात केली आहे. सांगली जिल्ह्यातही अनेक शेतकरी टोमॅटोची मोठ्या प्रमाणात शेती करत असतात. मागील दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोला अपेक्षित दर मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोला जवळपास 50 रुपये प्रति किलोपर्यंतचा बाजार भाव मिळत होता.
मात्र, आता टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली असून सध्या टोमॅटोला मात्र दहा रुपये प्रति किलो एवढा कवडीमोल दर मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आल्याचे चित्र सांगली जिल्ह्यात बघायला मिळत आहे. टोमॅटोच्या पिकातून उत्पादन खर्च काढणेदेखील मुश्किल होत असल्याने जिल्ह्यातील अनेक टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी टोमॅटो काढणी करण्याऐवजी टोमॅटो तसेच वावरात राहू दिले आहेत.
तालुक्याचे अनेक शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून टोमॅटोची शेती करत आले आहेत. शेतकऱ्यांना अनेकदा चढ-उताराचा सामना करावा लागतो. मात्र आता सलग दुसऱ्या वर्षी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना टोमॅटोचा उचित मोबदला मिळत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हतबल झाला असून यामुळे शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचे सांगितले गेले आहे. कोरोना, अतिवृष्टी त्यानंतर बदललेल्या हवामानाचा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
गेल्या वर्षी टोमॅटोला कवडीमोल दर मिळाला मात्र तरीदेखील तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने यावर्षी टोमॅटोची लागवड केली. मात्र फक्त वर्षे बदलले परिस्थिती जैसे थी वैसेच असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोला चांगला दर मिळत होता. मात्र आता टोमॅटो अगदी कवडीमोल दरात विक्री होत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
शेतकऱ्यांच्या मते, टोमॅटो पिकासाठी एकरी सव्वा लाख रुपयापर्यंत उत्पादन खर्च आला आहे. कारण की मध्यंतरी हवामान बदलामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागली होती. शेतकऱ्यांनी त्यावेळी महागड्या औषधांची फवारणी केली म्हणून त्यांच्या पदरात टोमॅटोचे चांगले उत्पादन पडले मात्र आता टोमॅटोच्या दरात घसरण झाली असल्याने चांगले उत्पादन प्राप्त करून देखील उत्पन्न मात्र कवडी मोलच राहणार आहे. एकंदरीत परिस्थीती बघता तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे बुरे दिन चालू असल्याच्या प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहेत.