Drone farming |इकडं अर्थमंत्र्यांनी सांगितलं अन् भंडाऱ्याच्या बहाद्दरानं ड्रोन शेतीचा प्रयोगही केला!
शेती उत्पादनात वाढ व्हावी आणि शेतकऱ्यांनी व्यवसयात (Technology) तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी केंद्र सरकार एक ना अनेक योजना राबवत आहे. जे शेतकऱ्यांनी स्वप्नातही पाहिले नाही असे उपक्रम आज थेट शेतीच्या बांधावर येत आहेत. त्याचअनुशंगाने (Drone Farming) ड्रोनच्या माध्यमातून शेती करण्यासाठी आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. शिवाय (Budget) अर्थसंकल्पामध्ये ड्रोन शेतीसाठी एक वेगळी तरतूद केली जाणार असल्याचे सांगितले आहे. यापूर्वी उस्मानाबाद, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर हे प्रयोग झाले आहेत. मात्र, अंर्थसंकल्पात तरतूदीची घोषणा केल्यानंतर भंडारा जिल्ह्यातील जेवनाळा येथे ड्रोनच्या माध्यमातून पीक फवारणीचा उपक्रम पार पडला आहे. शेतकरी विनायक बुरडे यांच्या शेतामध्ये ड्रोनद्वारे पिकासह भाजीपाल्याची फवारणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच असा प्रयोग होत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करीत असताना नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
एका दिवसामध्ये 10 एक्कर क्षेत्रातील फवारणी
शेतकरी विनायक बुरडे यांच्या शेतात किसान ड्रोन, माऊली ग्रीन आर्मी, महाराष्ट्र राज्य पर्यावरण समिती आणि आयोटेक वर्ल्ड एरिगेशनच्यावतीने हा प्रयोग यशस्वीरित्या सादर करण्यात आला. यावेळी टोमॅटो, मिर्ची आणि वांग्याच्या शेतीवर फवारणी करण्यात आली. विशेष म्हणजे ड्रोनच्या मदतीने एका दिवशी दहा एकर फवारणी शक्य असून एकाच ठिकाणी उभे राहून पाच एकरांची फवारणी रिमोटच्या मदतीने करता येत आहे. 30 मीटरपर्यंत उंच जाऊ शकणाऱ्या या ड्रोनमध्ये 10 लिटर कीटकनाशक साठविण्याची क्षमता असल्याने एकावेळी 4 नोझलद्वारे फवारणी करता येत आहे.
मजूरांचा प्रश्न मिटला अन् वेळेचीही बचत
काळाच्या ओघात मजूरांचा प्रश्न बिकट होत आहे. अधिकची मजूरी देऊनही शेतीकामास कोणी येत नाही ही बांधावरची स्थिती आहे. त्यामुळे शेतीकामे रखडत आहेत. मात्र, आता किटकनाशकांच्या फवारणीसाठी ड्रोनचा वापर वाढत गेला तर हा प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे शारीरिक कष्टही कमी होणार असून मजूरीसाठी जो पैसा खर्च होत होता त्याचीही बचत होणार आहे. शिवाय ड्रोनच्या माध्यमातून एका दिवसामध्ये तब्बल 10 एकरावरील फवारणी होणार असल्याने क्षेत्र लवकरच अटोपणार आहे. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शेती व्यवसयात वापर वाढत असून तो शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याचा ठरत आहे.
शेती पध्दतीमध्ये होतोय बदल
आतापर्यंत परंपारिक पध्दतीने शेती केली जात होती. त्यामुळे उत्पादनात वाढ होत नव्हती हे स्पष्ट झाले आहे. काळाच्या ओघात शेती आणि पीक पध्दतीमध्ये बदल केला तरच उत्पादनात वाढ होणार आहे. आता मात्र, प्रत्यक्षात हे बदल होताना पाहवयास मिळत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शेतीव्यवसयात ड्रोनचा वापर वाढणार असल्याचे सांगण्यात आले होते तर दुसरीकडे आदिवासी बहुल जिल्ह्यात हा प्रयोगही पार पडला आहे. मात्र, ड्रोन वापरायचा कसा यासंबंधी एक नियमावली जारी करण्यात आली आहे. शिवाय प्रयोगिक तत्वावरच सध्या शेतकऱ्यांना माहिती दिली जात आहे.